Top Newsराजकारण

लखीमपूर खिरीच्या घटनेमुळे देशभरातील राजकीय वातावरण तापले; विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : लखीमपूर खिरीच्या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली आहे. प्रियंका गांधी यांच्यानंतर आता समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खीरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह नऊ जण ठार झाले. ही घटना तिकोनिया-बनबीरपूर रस्त्यावर घडली. उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या दोन वाहनांनी आंदोलकांना कथितरीत्या धडक दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दोन्ही वाहनांची जाळपोळ केली. या घटनेत चार शेतकरी आणि वाहनांवरील इतर चार लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि खेरीचे खासदार अजय कुमार मिश्रा यांचे मूळ गाव असलेल्या मण्य यांच्या बनबीरपूरच्या दौऱ्याला शेतकरी विरोध करत होते.

लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल, अशी माहिती एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी दिली. मात्र, या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत असून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

अखिलेश यादव यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव लखनऊमध्ये त्यांच्या घराजवळ आंदोलनासाठी बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अखिलेश यादव लखीमपूर खिरीला जात असताना त्यांना यूपी सरकारच्या आदेशावर पोलिसांनी रोखले, असा दावा पक्षाने केला. त्यानंतर शेकडो सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या वाहनाला आग लावण्याची घटना घडली आहे. ही घटना घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर घडली आहे.

सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होत आहेत. एका व्हि़डीओमध्ये गाडीला लावण्यात आलेली आग पोलीस विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. हे कोणी केले माहीत नाही. आम्ही आत गेलो तेव्हा कोणीतरी हे केल्याचं देखील पोलिसांनी म्हटलं आहे. अखिलेश यादव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच याप्रकरणी मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. “हे सरकार शेतकर्‍यांवर ज्या प्रकारचे अत्याचार करत आहे, तसे अत्याचार इंग्रजांनी सुद्धा केले नाहीत. गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री (केशव प्रसाद मौर्य) यांनी राजीनामा द्यावा” असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.

तू मागे हटणार नाहीस, ते तुझ्या हिमतीने भयभीत झालेत…

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल यांनी ट्विट करून प्रियंका गांधींना हिंमत ठेवून मागे न हटण्यास सांगितलं आहे. तसेच प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू, असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे.

नवज्योत सिंग सिद्धू पोलिसांच्या ताब्यात

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना चंदीगडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातही लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या घटनेनंतर त्या ठिकाणी जाणाऱ्या अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोणालाही घटनास्थळी जाऊ दिलं नाही.

लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या घटनेच्या विरोधात नवज्योत सिंग सिद्धूंच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते पंजाबच्या राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत होते. यावेळी काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी सिद्धू यांनी केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या मुलाच्या अटकेची मागणी केली. यादरम्यान, चंदीगड पोलिसांनी सिद्धू आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हिंसक प्रयत्न; शरद पवार संतप्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करुन या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा हिंसक प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, असे पवार यांनी म्हटलं आहे.

नाना पटोलेंचा योगी सरकारवर निशाणा

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबीयांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालिबानी राज असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी लखीमपूर हिंसाचारासाठी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांना जबाबदार ठरवले आहे. मिश्रा म्हणाले, मी आणि माझा मुलगा त्यावेळी घटना स्थळी उपस्थित नव्हतो. या प्रकरणाची न्ययालयीन चौकशी व्हायला हवी. सत्य सर्वांसमोर येईलच. तसेच, ‘हिंसाचारात आमच्या कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांनाही भरपाई मिळायला हवी. या घटनेसंदर्भात आम्हीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली आहे. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी,’ असेही मिश्रा म्हणाले.

आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात मोदीजी; ‘आप’चा सवाल

या प्रकारानंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेची अशी नशा, धुंदी आजपर्यंत कुणी पाहिली नसेल किंवा ऐकीवात नसेल. आंदोलक शेतकऱ्यांवर मंत्र्याच्या मुलाने कार चढवली. यामध्ये तीन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात मोदीजी. गुन्हेगारांना अटक करून सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. कुटुंबांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान, आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला.

शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजप अन् मोदींची ‘पॉलिसी’ आहे का?, संजय राऊत संतापले

उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्यानं झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संबंधित परिसरात सरकारविरोधातील रोष वाढला आहे. या प्रकरणानंतर आता देशभर संतापाची लाट उसळताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपा आणि पंतप्रधान मोदींची अधिकृत ‘पॉलिसी’ आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

‘शेतकरी लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत आहेत. देशाच्या लोकशाही पद्धतीचं आपण जगाला उदाहरणं देतो आणि शेतकऱ्यांवर अशा पद्धतीनं चिरडण्याची कामं देशात केली जातात. उत्तर प्रदेशात सध्या आंदोलनांना चिरडण्याची नवी प्रथाच सुरू झाली आहे. तर विरोधकांना अशा ठिकाणी पोहोचण्यापासून पीडितांची भेट घेण्यापासून रोखण्याचा नवा खेळ उत्तर प्रदेश सरकारनं सुरू केल्याचं आपण गेल्या काही प्रकरणांपासून पाहत आलो आहोत. प्रियांका गांधींना रोखण्यात आल्याचं मला कळालं. भाजपानं काय शेतकऱ्यांना चिरडण्याची अधिकृत पॉलिसीचा स्वीकार केलाय का? हे त्यांनी सांगावं, असं संजय राऊत म्हणाले.

शेतकऱ्यांशी तुम्हाला पंगा घ्यायचा आहे का? तसं असेल तर खुशाल शेतकऱ्यांना विरोध करा मग बघा देशभरात काय होईल तेही पाहा. शेतकरी तुमच्या विरोधात असतील पण ते काय देशद्रोही आहेत का? त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीश सरकारी वागणूक तुम्ही देत आहात. मुंबईत बाबू गेनूनं ब्रिटीशांना विरोध करताना त्यांच्या ट्रकखाली झोपून आंदोलन केलं होतं. त्यावेळी ब्रिटीशांनी त्याच्या अंगावरुन ट्रक चालवला होता. उत्तर प्रदेशातही अशाच पद्धतीचा प्रकार करण्यात आला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा : नाना पटोले

देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरणच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे. बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची ही संतापजनक घटना तालीबानी प्रवृत्तीचे निदर्शक असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ व शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, किसान काँग्रेसचे श्याम पांडे, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद आदी उपस्थित होते.

आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, शेतकरी हा या देशाचा आधार आहे. अनन्दाता आहे, त्यालाच संपवण्याचे काम भाजप करत आहे. लखीमखेरी येथे झालेल्या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र बंद करु इशाराही पटोले यांनी दिला.

काँग्रेस नेत्या व सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमखेरी येथील पीडित शेतकरी कुटुंबाला भेटण्यासठी जात असताना त्यांची अडवणूक केली, त्यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले आणि शेवटी बेकायदेशीर अटकही केली. या सर्व घटनांचा निषेध करुन प्रियंका गांधी यांना सोडा नाहीतर राज्यभर जेलभरो आंदोलन करु असेही पटोले म्हणाले. भाजपा सरकार सातत्याने शेतकऱ्यावर अन्याय करत असून महाराष्ट्रातही शेतकरी संकटात असताना मदत देण्यात दुजाभाव केला जात आहे. त्यावरही भाजपा राजकारण करत आहे. या सर्वांचा हिशोब भाजपाला द्यावा लागेल.

लखिमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडणाऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे आंदोलन करण्यात आले. तर जळगाव येथे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तसेच लातूर, सोलापूरसह राज्यभर सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी भाजपा व उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करुन निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा व उत्तर प्रदेशातील अजयसिंह बिष्ट सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेचा निषेधही करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button