नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे ४७ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोना संसर्गामुळे आणखी ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ३२ हजार नवे रुग्ण सापडले असून, याबाबत ते राज्य देशात आघाडीवर आहे.
देशात १ जुलै रोजी कोरोनाचे ४८,७८६ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. देशात कोरोना रुग्णांचा आकडा आता ३ कोटी २८ लाख ५७ हजार ९३७ इतका झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये केरळमध्ये ३२,८०३ नवे रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये सर्वांत जास्त नवे रुग्ण आढळले.
जगभरात २१ कोटी ९३ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी १९ कोटी ६१ लाख लोक बरे झाले. या संसर्गाने ४५ लाख ४६ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ कोटी ८६ लाख रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील १ लाख ४ हजार जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी बूस्टर डोस द्यायचा की नाही यावर जगभर विचारमंथन सुरू आहे. जो काही निर्णय होईल तो वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर घेतला जाईल, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेने या बूस्टर डोसला मंजुरी दिलेली नाही. देशातही नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे या विषयाकडे लक्ष आहे.