देशात एका दिवसातील सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद
नवी दिल्ली : भारतात मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३२९३ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातही मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा
महाराष्ट्रात सोमवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली होती. पण मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनाची तिची स्थिती दिसत हे. राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजार ३५८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ८९५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख १० हजार ८५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६७ हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात राज्यातील ६७ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३६ लाख ६९ हजार ५४८ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२१ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६२ लाख ५४ हजार ७३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४ लाख १० हजार ८५ (१६.८० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ लाख ६४ हजार ९३६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३० हजार १४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच अजूनही ६ लाख ७२ हजार ४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.