मुंबई: आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. आज दुपारी सीसुमारे ३ तास बैठक झाली त्यामध्ये २४ ऑक्टोबरला गट क ची परीक्षा, तर गट ड साठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती १ ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राजेश टोपे यांनी ९ दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता. त्यावरकारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
न्यासा ही संस्था आरोग्य विभागाने ठरवली नव्हती. सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ५ एजन्सी निवडल्या आहेत. आरोग्य विभागाचं काम हे परीक्षेचा पेपर तयार करणे हे काम होतं. पेपर प्रिटिंग, परीक्षा केंद्र निवडणं, इतर बाबी या संबंधित एजन्सीच्या असतात. आरोग्य विभागानं पेपर तयार करुन त्यांच्याकडे सोपवण्याचं काम केलंलं आहे. या संस्थेचं अन्य विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी काम केलंलं आहे, असं सांगण्यात आलं. मात्र, प्रश्नपत्रिका तयार करणं हेचं आमचं काम असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
ऑडिओ क्लिपचा तपास करणार
ऑडिओ क्लिप कुणी बनवली त्यात तथ्य आहे का.? अशा कुठल्याही बाबतीत पोलीस ठाण्यात तक्रार द्याव्यात ही मी विनंती करत आहे, असं राजेश टोपे म्हणाले. आम्हाला नावे कळले तर आम्ही तक्रार देऊ, आम्ही अमरावती आणि पुणे एसपी ला पत्र देऊन कळवलं आहे, असंही राजेश टोपे म्हणाले. दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.