मुक्तपीठ

गड आला, पण सिंह गेला!

- प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

अत्यंत चुरशीची ठरलेली पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसने बाजी मारलेली असली तरीही ममता बॅनर्जी त्यांच्या मतदारसंघात नंदीग्राममध्ये अपयशी ठरल्या आहेत. दीदींना भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला.त्यामुळे
गड आला, पण सिह गेला. असं आता म्हणण्याची वेळ आली आहे.प. बंगाल मध्ये दीदींनी ऐतिहासिक विजय मिळवला असला तरी नंदीग्राम मध्ये त्या हरल्या. ममता बॅनर्जी १९५७ मतांनी पराभव झाल्याचं बोललं जात आहे.नंदीग्राम मध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी जिंकले असल्याची माहिती समोर आली आहे.

ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.
तृणमुलमधील बडे बडे नेते भाजपच्या गळाला लागूनही तृणमुलने बंगालमध्ये २०० चा आकडा पार केला. मात्र, संपूर्ण पश्चिम बंगाल एकहाती जिंकताना त्यांना स्वत:च्याच मतदारसंघात पराभव स्विकारावा लागला आहे.

देशात ५ राज्यांच्या निवडणुकांसाठी मतमोजणी आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना सगळ्यांचं लक्ष मात्र आहे ते पश्चिम बंगालमधल्या एका विधानसभा मतदारसंघाकडे. वास्तविक पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान झालं. पण निवडणुकीच्या आधी देखील आणि मतदानाच्या नंतर देखील चर्चा राहिली ती नंदीग्रामची! कारण या मतदारसंघामधून खुद्द पश्चिम बंगाल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली. पण या मतदारसंघाला महत्व जसं मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीमुळे आलं, त्याहून जास्त महत्व हे मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघाची निवड का केली? या कारणामुळे आलं होतं. काय आहे नेमका नंदीग्रामचा इतिहास?

पश्चिम बंगालमधल्या नंदीग्रामचा इतिहास पाहिला, तर आत्तापर्यंत हा मतदारसंघ ८ वेळा डाव्या पक्षांच्या ताब्यात राहिला आहे. पण त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये देखील डाव्या पक्षांचच सरकार होतं. मात्र, पुढच्या तीन वेळा या मतदारसंघामध्ये तृणमूल काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळेच भाजपानं या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यासाठीच भाजपानं या मतदारसंघासाठी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि तृणमूलचे फायरब्रँड नेते सुवेंदू अधिकारी यांना पक्षात आयात करून उमेदवारी दिली!

नॅनो प्रकल्पामुळे पेटली ठिणगी!

नंदीग्राम हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यामध्ये येतो. या जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर अधिकारी वर्गाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे सुवेंदु अधिकारी यांच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांनी हा मतदारसंघ अक्षरश: डाव्यांच्या नाकाखालून खेचून आणला होता. टाटांच्या नॅनो प्रकल्पामुळे नंदीग्रामचं नाव तमाम भारतीयांना परिचित झालं होतं.

२००७मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी टाटांसोबत करार करून सिंगूरमध्ये नॅनो प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ४८ हजार एकरमध्ये सलीम ग्रुपच्या मदतीने सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र) उभारला जाणार होता. पण सिंगूरमध्ये मोठा विरोध झाला. खुद्द ममता बॅनर्जी देखील उपोषणाला बसल्या. परिस्थिती चिघळू लागल्यानंतर हा प्रकल्प पूर्व मिदनापूरच्या नंदीग्राममध्ये हलवण्यात आला. तिथेही स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तुफान विरोध केला. ममता बॅनर्जी देखील त्या विरोधामध्ये सहभागी होत्या. त्यावेळी झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपला जीव देखील गमवावा लागला. अखेर नॅनो प्रकल्प गुजरातच्या सानंदमध्ये हलवण्यात आला. आणि नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पूर्णांशाने प्रभाव प्रस्थापित झाला.

आणि नंदीग्राम तृणमूलकडे आला!

तत्कालीन मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री असलेले शिशिर अधिकारी यांचे पुत्र आहेत सुवेंदू अधिकारी. २००७च्या संघर्षानंतर ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांना हाताशी धरून हा मतदारसंघ तयार केला. सगळं वातावरण तयार असल्यामुळे हा मतदारसंघ डाव्यांच्या हातातून अलगद तृणमूलच्या झोळीत आला. तेव्हापासून इथे तृणमूलच्याच उमेदवाराचा ‘अधिकार’ राहिलेला आहे.

ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील मंत्रीपदाचा आणि पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. डिसेंबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये भाजपानं ममता दीदींच्या नाकावर टिच्चून सुवेंदू अधिकारी यांना नंदीग्राममधून उमेदवारी दिली.

पण सहज माघार घेतील त्या ममतादीदी कसल्या? इतक्या वर्षांचा हक्काचा भोवानीपूर मतदारसंघ सोडून ममता दीदींनी थेट नंदीग्राम मतदारसंघ निवडला. एवढंच नाही, तर पक्षातील ज्येष्ठांनी सांगूनही दोन मतदारसंघांचा पर्याय नाकारून फक्त नंदीग्राममधूनच उमेदवारी अर्ज भरून सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून आख्ख्या भाजपालाच आव्हान दिलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपानं आणि ममता बॅनर्जींनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली! दोन्ही बाजूंनी आपली सर्व ताकद पणाला लावली गेली. तीव्र शब्दांत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळेच नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देशभरात हॉट टॉपिक ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button