राजघराण्यातील व्यक्तीच्या हातात पहिल्यांदाच झाडू !
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हातात झाडू घेऊन रस्त्यावर साफसफाई केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. शिंदे हा राजघराण्यातील असून त्यांचे वडिलही मंत्री होते. त्यामुळे, आजपर्यंत त्यांच्या हातात कधीच झाडू पाहण्यात आला नव्हता. मात्र, आज त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना लक्ष्य केलंय.
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयीन परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. तर, दोनच दिवसांपूर्वी बुऱ्हानपूर मतदारसंघात डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे, आता काँग्रेसने शिंदेंच्या या व्हिडिओवरुन टीका केली आहे. नरेंद्र सलूजा यांनी ट्विट करुन निशाणा साधला आहे. नागरी उड्डायान मंत्रालयात आता एवढंच राहिलं होतं, उंचीवरुन जमीनवर… अस्वच्छ जागेवर सफाई केली असती, तर चांगला संदेश गेला असता. मात्र, साफ-स्वच्छ रस्त्यावर स्वच्छतेचं नाटक, फोटोसेशन योग्य नाही, असे सलूजा यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदेंनी लवकरच भाजपशी मिळत-जुळतं घेतल्याचं दिसून येत आहे. सोमवारी सकाळी दिल्लीतील नागरी उड्डायान मंत्रालयाजवळ त्याची झलक पाहायला मिळाली. सकाळी मंत्रालयात पोहोचताच, त्यांनी सफाई अभियान सुरू केलं. मंत्रालयातील सर्वच स्टाफला बोलावून विशेष स्वच्छता अभियानात योगदान देण्याचं सांगितलं. विशेष म्हणजे शिंदे कुटुंबीयांत पहिल्यांदाच कुणीतरी झाडू हातात घेतल्याचं दिसून आलं.