राजकारण

गोवा विधानसभेसाठी काँग्रेसच्या ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पणजी : पूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं आपल्या ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. सर्वात अगोदर उमेदवार जाहीर करून आघाडी घेण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. पहिल्या टप्प्यात आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली असून लवकरच इतर उमेदवारांची यादी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी म्हापशातून सुधीर कानोलकर, तळैगाव मतदारसंघातून टोनी रॉड्रिग्ज, पोंडामधून राजेश वेरेणकर, मरमुगाव मतदारसंघातून संकल्प अमोणकर, कुर्तोरिममधून अलेक्सो ल्युरेन्को, मडगावमधून दिगंबर कामत, कुंकोळीमधून युरी आलेमाव तर क्वेपेममधून अल्टोन डिकोस्टा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

गोव्या विधानसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता असून तृणमूल काँग्रेसनेही या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी या निवडणुकीत युती केली आहे. तर आम आदमी पक्षानंही या निवडणुकीसाठी कंबर कसली असल्यामुळे ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. मात्र काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात सूर जमण्याची शक्यता नसल्याने याचा फायदा कुणाला होणार, याची जोरदार चर्चा राज्यात रंगली आहे.

एकूण ४० जागा असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फुटीची भीती असल्यामुळेच उमेदवार जाहीर करण्याची घाई केल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्यात काँग्रेसला फुटीचं ग्रहण लागल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजपसह इतर पक्षांनी उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यापूर्वी तिकीटवाटप करून पडझड थांबवणं आणि उमेदवारांना तयारीसाठी वेळ देणं या दोन्ही कारणांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसनं जाहीर केलेल्या यादीमुळे निवडणूक प्रक्रियेत आता खऱ्या अर्थानं रंगत यायला सुरुवात होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button