कुणाला मदत करायची असेल तर डाव्या हाताने केलेली मदत उजव्या हातालाही कळायला नको असे जुने लोक म्हणायचे. त्यामागे मोठी उदात्त भावना होती. *लोक उपकाराच्या ओझ्याखाली दबले की लाचार बनतात आणि लाचार नागरिक हा समाजाचा गाडा पुढे हाकण्यास कमकुवत असतो याची जाणीव पूर्वीच्या काळी धुरीण लोकांना उत्तम जाणीव होती*.आपण केलेली मदत कुणालाही सांगू नये आणि कुणी केलेली मदत लपून राहता कामा नये हा विनम्र भाव त्यामागे होता. आजही अनेक लोक हा भाव जपताना दिसतात, इतर मात्र आठ आण्याची केली कुणाला तरी वाटताना फोटोत येण्याची स्पर्धा करतात.
कोविड काळात किंवा अलीकडे पूरग्रस्त लोकांना मदत करताना राजकीय लोकांनी तर कंबरेचे सोडून जणू डोक्याला गुंडाळले आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती जाणवत आहे. बहुतांश राज्यात सध्या भाजप सत्तेत असल्यामुळे हा दोष त्या पक्षाकडे जातो अन्यथा असे हरिकराव सर्वच पक्षात दाटीवाटीने भरले आहेत. कुण्या नेत्याचा वाढदिवस असला की दोन पाच डझन केळी रुग्णांना वाटप करण्याचा कार्यक्रम आपल्याकडे मोठा लोकप्रिय असतो. हिंग लगे ना फिटकरी असे त्याला म्हटले जाते. कमी पैशात जास्त प्रसिद्धी देणारे हे उपक्रम असतात त्यामुळे राजकीय कार्यकर्ता त्याकडे चटकन वळतो.
नैसर्गिक आपत्तीचा सामना ज्यांना करावा लागतो असे सर्वच परिवार काही गरीब नसतात, प्रासंगिक गरज म्हणून त्यांना तात्पुरता दिलासा हवा असतो. अशावेळी मदत करणारे लोक स्वतःला दानशूर कर्ण समजून वागत असतात हे अधिक वाईट असते. *मदत करताना त्याचा बोभाटा करण्याची नवी प्रथा राजकीय पक्षांनी सुरू करून घेणार्याला लाचारांच्या पंगतीत नेऊन बसवले याचे वाईट वाटते*.पूरग्रस्तांना मदतीच्या किट वाटताना त्यावर जे नेत्यांचे फोटो छापले जातात ते अतिशय किळसवाणे भासतात. शंभर रुपयांची सामग्री ज्या पिशवीत असते त्यावर दोन डझन लोकांचे फोटो टाकताना कुणालाही लाज वाटत नाही हे खूपच वेदनादायी असते.
परवा उत्तर प्रदेशात, आज महाराष्ट्र तर उद्या आणखी कुठल्यारी प्रदेशात असे माणुसकीला लाजवणारे कार्यक्रम सुरू असतात. त्यावेळी एकही सुज्ञ, सुजाण व्यक्ती पुढे का येत नाही, असा प्रश्न आपल्याला पडत असला तरी त्याच्या उत्तराची अपेक्षा आताच्या कुण्या राजकीय पक्षाकडून ठेवता येत नाही एवढे सगळे कोडगे बनले आहेत. *ज्या सामान्य माणसाच्या बळावर तुम्ही सिंहासनावर आरूढ झाला असता त्या माणसाला इतकेही लाचार करू नका. लोकांना अनेकदा मदतीची नव्हे तर धैर्य, दिलासा देण्याची गरज असते. या संकटात आम्ही तुझ्यासोबत आहोत हा शब्द ऐकण्यास त्यांचे कान आतुरतेने वाट पाहत असतात*. अशावेळी त्याचा छळ करण्याचा अधिकार तुम्हाला कुणीही दिलेला नसतो हे लक्षात घ्यायला हवे. दान केल्याने पुण्य वाढत असेल पण माणुसकी सोकावते आणि मदत केल्याने मानवता अधिक उन्नत होते. *दानाची सीमा धर्माची रेषा ओलांडत नाही मात्र मदतीला कशाचीही सीमा, मर्यादा असू शकत नाही. संकटात असणार्या कोणत्याही घटकाला होणारी मदत माणुसकीच्या शिरावरील मुकुटात आणखी एक कोंदण चढवत जाते तर उपकार कुणाला तरी अहंकाराच्या ओझ्याखाली दाबत जाते हा फरक ज्यांच्या लक्षात येतो ते घटक पुण्य कमावण्याच्या भानगडीत पडत नाहीत*. मदत करतात पण त्याची माहिती उजव्या हाताला होऊ नये याची काळजी घेतात, कुठे असे दातृत्व आणि कुठे सस्ती लोकप्रियता मिळवणार भणंग?