Top Newsराजकारण

बिपीन रावत यांचे निधन म्हणजे भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाला झटका; बेशरम चीनची प्रतिक्रिया

शांघाय : चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या ग्लोबल टाईम्सने सीडीएस बिपीन रावत यांचे निधन म्हणजे भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाला मोठा झटका म्हटले आहे. हेलिकॉप्टर अपघातात भारताच्या संरक्षण प्रमुखाचा मृत्यू म्हणजे भारतीय सैन्यात अनुशासन आणि युद्धाच्या तयारीमध्ये कमतरता, त्रुटी असल्याचे दाखविले आहे. ग्लोबल टाईम्सने दोन्ही देशांच्या सीमाभागात रावत यांच्या जाण्याने भारताच्या आक्रमकतेत काही फरक पडेल असे वाटत नाही, असे काही तज्ज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे.

एकीकडे भारताचा जानी दुश्मन असलेल्या पाकिस्तानने सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला असताना दुसरीकडे चीनने गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्सने बिपिन रावत यांच्या अपघातामागे भारतीय सैन्यातील अनेक त्रुटी असल्याचे म्हणत रावत हे चीनविरोधी होते, अशी गरळ ओकली आहे.

अपघाताची संभाव्य कारणे रशियन हेलिकॉप्टरमध्ये बिघाड नव्हता, तर भारताची मानवी चूक असल्याकडे बोट दाखवितात असे म्हटले. रशियाचे एमआय १७ हेलिकॉप्टर हे अतिशय अद्ययावत हेलिकॉप्टर आहे. ताकदवान इंजिन आणि त्यावरील प्रणाली त्या हेलिकॉप्टरला विश्वासार्ह बनविते असे बिजिंगचे सैन्य विशेषज्ञ वेई डोंगक्सू यांनी ग्लोबल टाईम्सला सांगितले आहे.

डोंगक्सू यांनी सांगितले की, भारतीय सैन्य अनेक प्रकारची हेलिकॉप्टर वापरते. रशिया, अमेरिकेतून आयात केलेली, भारतीय बनावटीची, परदेशातील तंत्रज्ञान वापरून भारतात बनविलेली अशी हेलिकॉप्टर आहेत. यामुळे हेलिकॉप्टरचा मेंटेनन्स आणि लॉजिस्टिक सपोर्टची कमतरता नक्की असणार. भारतीय सैनिक नेहमी मानक संचलन प्रक्रियेचे, नियमांचे पालन करत नाहीत, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button