जिनांसारख्या देशद्रोही लोकांची देशाला गरज नाही : इंद्रेश कुमार
नवी दिल्ली: देशाला अब्दुल कलाम यांच्यासारख्या देशभक्तांची गरज आहे. मोहम्मद अली जिनांसारख्या देशद्रोह्यांची गरज नाही. मोहम्मद अली जिनांप्रमाणे विचारसणी असणाऱ्यांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (आरएसएस) चे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अनेक मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. या वक्तव्यांनंतर संघासह भाजपवर विरोधकांची जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. यातच आरएसएसचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी पुन्हा एकदा मोठे विधान करून चर्चेला तोंड फोडले आहे. विशाल भारत संस्थान तसेच मुस्लीम महिला फेडरेशन आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाने संयुक्तरित्या आयोजित एका कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, देशाला एकत्र आणणारी कलामांसारखी व्यक्ती सध्या हवीय. जिनांसारखा द्रेशद्रोही देशाला नकोय. हा देश बहादुर शाह जफार, अशरफुल्लाह खान, बेगम हजरत महाल यासारख्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा हा देश आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारत देश कलमांसारख्या शास्त्रज्ञांचा आहे. जिनांसारख्या लोकांची आणि तशी विचारसरणी असणाऱ्यांची देशाला गरज नाही. अशा व्यक्तींवर पूर्णपणे बहिष्कार घातला पाहिजे. जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. त्यांच्यामुळे आपण एकमेकांशी लढतोय. अशा लोकांना चांगले आणि देशभक्त म्हणणे पाप आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.
चीन मुद्द्यावर बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले की, चीनला धडा शिकवणाऱ्यांना आपण पाठिंबा देणे गरजचे आहे. पाकिस्तानच्या हेकेखोरीपासून आपल्याला वाचवणाऱ्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील मुस्लीमांच्या एका हातामध्ये कुराण आणि दुसऱ्या हातात कंप्युटर देण्यासंदर्भातील भूमिका पूर्वीच स्पष्ट केली, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची सत्ता होती तेव्हा तेथे वरचेवर दंगली व्हायच्या. दिवसाढवळ्या समाजकंटकांकडून महिलांची छेड काढली जायची. तेव्हा त्यांना मदत करणारेही कोणी नव्हते. आता आपल्याकडे एक सशक्त सरकार आहे. आता राज्यात दंगली होत नाहीत, असे सांगत इंद्रेश कुमार यांनी योगी सरकारचे कौतुक केले.