नाशिक : राज्यात सरकारचे अस्तित्वचं दिसत नाही, महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही राज्य मुंबईच्या बाहेर देखील आहे, हे यांना माहितच नाही’ असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
फडणवीस हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्री म्हणून नाशिक महापालिकेचा अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. नाशिककरांसाठी मेट्रो निओ हा पथदर्शी प्रकल्प आणला. मेट्रो निओ हा देशभरासाठी पथदर्शी प्रकल्प आहे. केंद्रांची मंजुरी मिळाली आणि राज्य सरकारनं चालत्या सायकलमध्ये स्पोक घातला नाही तर निओ मेट्रोचं काम सुरू झाल्यानंतर पुढील ३ वर्षांत नाशकात मेट्रो धावायला लागेल, असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.
आम्हाला निर्मल नाशिक करायचंय. दत्तक घेतले म्हणजे रोज महापालिकेत हस्तक्षेप करून दलाली खायची असं नाही. आत्तापर्यंत सिटी बस सेवेचा 5 लाख नागरिकांनी लाभ घेतला. आम्हाला दलाली खाण्यासाठी राज्य नको, तर लोकांची कामं करण्यासाठी, विकासासाठी हवं असतं. कोविडच्या काळात नाशिकवर अन्याय होतांना पाहिला. नाशकात महापालिकेने कोविड सेंटर सुरू केलं. राज्याने एक पैशाचीही मदत केली नाही. नाशिकला ऑक्सिजन मिळवण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं. भाजपनं संघर्ष करून नाशिककरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, असंही फडणवीस म्हणाले.
हे तिघे काहीही बोलले तरी आपल्या विरोधात लढण्यासाठी हे तिघे एकत्र येतील. भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येतील. राजकारणात १ आणि १ बरोबर, २ होत नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.
तिकीट वाटपात नेत्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करायचाय, कार्यकर्त्यांनी पार्टीचा विचार करायचाय. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष, आपल्या जवळ नरेंद मोदी आहे. छत्रपतींचे मावळे फार कमी असायचे पण मोगलांवर भारी पडायचे. तसंच छत्रपतींना आराध्य मानणारे मोदी आपले नेते आहेत आणि आपण त्यांचे मावळे आहोत, असं म्हणत फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.
भगव्या झेंड्याच्या रक्षणाची जबाबदारी आता आपली
देशाला मार्गदर्शन देणाऱ्या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आता भाजपावरती आली असून भाजपने ही जबाबदारी स्वीकारली आहे. भगव्या झेंड्याचे रक्षण करून समाजाला न्याय देण्यासाठी सतत झगडत राहू, असा विश्वास फडणवीस यांनी नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे बाण चालवले. आज काही जणांनी भगवा झेंड्याच्या नावाखाली वेगळे कामे सुरू केले आहे परंतु, आता या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. कारण भगवा हा शिवछत्रपतींचा आहे, शिवछत्रपती महाराज हे महाराष्ट्राचा आदर्श आणि दैवत आहे. त्यांच्या झेंड्याचा अपमान करणाऱ्यांना आता समाजामध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही, अशा शब्दात फडणवीसांनी शिवसेनेवर टिका केली.