मुक्तपीठ

द बर्निंग स्टेट

- मुकुंद परदेशी (संपर्क - 7875077728)

सर्वत्र गोंधळ उडाला आहे. हलकल्लोळ माजला आहे.जणू आगच लागली आहे राज्याला, ‘ द बर्निंग ट्रेन’ चित्रपटात ट्रेनला लागते तशी ! अशा परिस्थितीत तातडीची त्रिपक्षीय बैठक ( अर्थातच व्हीसीद्वारे) बोलावली जाते. बैठकीला विशेष निमंत्रित म्हणून शत्रूगटातून बंडाळीच्या तयारीत असलेल्या शंभूराजे कोल्हापूरकरांना बोलविण्यात आलेले असते. दिल्लीच्या बादशहाच्या दरबारात जायचं असेल तर त्याच्या मर्जितल्या मिर्झाराजे जयसिंगाच्या मध्यस्थीनेच जावं एवढं (आणि एवढंच) इतिहासाचं जुजबी ज्ञान असल्यामुळे देवानाना नागपूरकरांनाही बैठकीत सामील होण्याची विनंती दस्तुरखुद्द उधोजीराजेंनी केलेली असते, पण ‘ मी नंतर तुम्हाला गोष्टी सांगीन युक्तीच्या चार.’ असा निरोप देऊन त्यांनी बैठकीत भाग घेणे टाळलेले असते.

बैठकीत सहभागी होणारे सगळे, म्हणजे बाळराजे, वाचाळ संपादक, बाळा (साहेब) संगमनेरकर, ‘आदर्श’राव नांदेडकर, ‘ तेलही गेले तूपही गेले – – ‘ छाप नाना, पायचीत होता होता वाचलेले ‘करुणा’मूर्ती धनुभाऊ, पदसिद्ध ‘रजाराखीव मुख्यमंत्री’ दादासाहेब बारामतीकर ऑनलाइन आल्याची खात्री करून उधोजीराजे बोलायला सुरुवात करतात. देवानाना नागपूरकरांनी सांगितलेल्या ‘युक्तीच्या चार गोष्टीं’मुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या गोंधळाची जागा आता आत्मविश्वासाने घेतली आहे.

उधोजीराजे – ( आत्मविश्वासाने) तर, आज आपण सगळे का भेटतोय हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. नाहीच आहे गरज. किंबहुना, मी तर म्हणेन की अशी गरज असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आपल्या, ( स्मितहास्य करत शंभुराजेंकडे पाहत ) म्हणू ना तुम्हाला ‘आपल्या’ , काही हरकत नाही ना ? ( शंभूराजे स्मित करत होकारार्थी मान डोलावतात) तर आपल्या शंभुराजेंनी सगळ्यांच्याच गाठीभेटी घेत , अगदी ‘बंद पडलेल्या जुनाट रेल्वे इंजिन’मध्ये जाऊनही तो विषय आधीच सर्वतोमुखी केलेला आहे. शिवाय ऑक्सिजन, लसी, व्हेंटिलेटर, जीएसटीचे बाकी असलेले पैसे अडचणी तरी किती सांगाव्या ? पण सांगाव्या तर लागतीलच ना ? किंबहुना सांगायलाच हव्यात. माझ्या महाराष्ट्रासाठी कोणाला हात जोडावे लागले, कोणाच्या पाया पडाव्या लागल्या, अगदी कोणासमोर गुडघे टेकावे लागले तरी मी टेकीन गुडघे. परिस्थितीच तशी ओढावली आहे,आगच लागली आहे जणू ! अशा परिस्थितीत हुकुमाची पानं दिल्लीश्वरांच्या हातात असल्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित त्यांच्याकडे जाऊन त्यांना साकडं घालावं असं मी ठरवलं आहे. आमचे जुने मित्र देवानाना नागपूरकर यांनी मला तिथे जाऊन काय करायचं आहे ते व्यवस्थितपणे सांगितलं आहे. इथे त्याची जाहीर चर्चा करण्यापेक्षा मी ते प्रत्येकाला स्वतंत्रपणे कळवणार आहे. तर आज रात्रीच्या विमानाने आपण सर्वांनी दिल्लीला जायचं आहे. हा निर्णय आपल्या सर्वांच्या संमतीने घेण्यात आला आहे असं मी जाहीर करतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.

या मिटींगला हजर असलेले सर्व सन्माननीय सदस्य दुसऱ्या दिवशी सकाळी ७, लोककल्याण मार्ग, न्यू दिल्ली या पत्त्यावर, गेटच्या समोर प्रार्थनेसाठी गुडघे टेकून बसलेले आहेत. दिल्लीश्वर मोरांना दाणे टाकण्यासाठी बागेत केव्हा येतात याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.ते बाहेर आले म्हणजे आपण त्यांच्या नजरेच्या टप्प्यात असू आणि ते आपल्या आवाजाच्या टप्प्यात असतील अशी जागा गेटवरच्या गुरख्याला देवानाना नागपूरकरांचं नाव सांगून आधीच निवडण्यात आली आहे. थोड्या प्रतीक्षेनंतर अखेर तो सुवर्णक्षण उगवतो, दिल्लीश्वर मोरांना दाणे टाकण्यासाठी अंगणात प्रकट होतात. दाणे मिळावेत म्हणून मोरांनी कुठे गुढगे टेकले आहेत, मग आपणच का गुढगे टेकायचे, असा बालसुलभ प्रश्न बाळराजेंना पडतो, पण आजूबाजूचे गंभीर वातावरण पाहून ते काही विचारणं टाळतात. मनोमन देवानानांचं स्मरण करून उधोजीराजे सर्वांना डोळ्यांनीच इशारा करतात. सर्व एका सुरात गाऊ लागतात. –

तेरी है ज़मीन तेरा आसमान, तू बड़ा मेहरबान तू बक्शीस कर
सभी का है तू, सभी तेरे, ख़ुदा मेरे तू बक्शीस कर
ओ तेरी मर्ज़ी से ऐ मालिक हम इस दुनिया में आये हैं
तेरी रहमत से हम सबने ये जिस्म और जान पाए हैं
तू अपनी नज़र हम पर रखना, किस हाल में हैं ये ख़बर रखना
तू चाहे तो हमें रखे, तू चाहे तो हमें मारे
ओ.. तेरे आगे झुकाके सर, खड़े हैं आज हम सारे
ओ.. सबसे बड़ी ताक़त वाले,तू चाहे तो हर आफत टाले
तेरी है ज़मीन तेरा आसमान, तू बड़ा मेहरबान तू बक्शीस कर
सभी का है तू, सभी तेरे, ख़ुदा मेरे तू बक्शीस कर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button