मुंबई : अखेर सरकारचा अंतरिम पगारवाढीचा कालचा प्रस्ताव पाहता एसटी संपात सहभागी झालेले सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदान सोडत हे आंदोलन त्यांच्यापुरते थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आझाद मैदानावर आक्रमक झालेले लाखभर एस.टी.कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. त्यांनी आंदोलनाचा वणवा असाच पेटता राहील, असा इशारा सरकार आणि विरोधकांनाही दिलाय. त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन कुठले वळण घेणार, याची चर्चा सुरू झाली.
सदाभाऊ खोत यांनी आज आझाद मैदानावरील आंदोलकांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आंदोलन कसे लढायचे याची रणनीती असते. तुम्ही हे आंदोलन पूर्वीपासून सुरू केले. आम्ही तुम्हाला येऊन सहभागी झालो. शेवटपर्यंत तुमच्या पाठिशी असू. मात्र, विलीनीकरणाचा प्रश्न कोर्टात आहे. त्यावर कोर्ट काय निर्णय देणार, सरकार काय भूमिका घेणार आणि पुढे काय, असे असायला हवे. आंदोलन सुरू ठेवायचा तुमचा निर्णय आहे. आमचा तुम्हाला पाठिंबा आहेच. मात्र, तूर्तास आम्ही बाहेर पडतोय. आमची भूमिका नंतर स्पष्ट करू. आंदोलकांनी आंदोलकांची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले.
आझाद मैदानावर बसलेले आंदोलक मात्र इरेस पेटले आहेत. त्यांनी आंदोलन म्यान करणार नाही, असा इशारा दिला. महिला आंदोलक सविता म्हणाल्या की, ऐन दिवाळीपासून लाखभर एस.टी. कर्मचारी आझाद मैदानात धडकला. आम्हा साऱ्यांची विलीनीकरणाची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन असेच सुरू राहील. सरकारच्या या मागण्या आम्हाला मान्य नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. इतर आंदोलकही हीच भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे यापुढे आंदोलक अजून पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईतल्या आझाद मैदानावरच ही परिस्थिती आहे, असे नव्हे. तर राज्यातल्या ठिकठिकाणच्या डेपोसमोर सुरू असलेल्या आंदोलकांचीही हीच भावना असल्याचे दिसते. बीड येथील एस.टी.डेपोसमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनीही आक्रमक भूमिका घेत तूर्तास आंदोलन मागे घेणार नाही, असाच इशारा दिला. इथले कर्मचारीही फक्त विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत. त्यामुळे सरकारने उशिरा का होईना पगारवाढीची घेतलेली भूमिका आंदोलनावर मात्रा ठरेल, असे चिन्ह सध्या तरी दिसत नाही.