तो ई-मेल माझाच; परमबीर सिंग यांचे ‘लेटर बॉम्ब’वर स्पष्टीकरण
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी पत्रातून केला. या लेटर बॉम्ब (Letter Bomb) नंतर राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. विरोधक गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, ज्या पत्रावरून खळबळ उडाली त्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शंका उपस्थित करण्यात आली. मात्र, आता परमबीर सिंग यांनी तो ई-मेल माझाच असल्याचे स्पष्ट केलं आहे.
परमबीर सिंग यांना एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना तो ई मेल माझाच आहे, असं सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेला मेल हा माझ्याच ई-मेल आयडी वरून पाठवला आहे, असं स्पष्टीकरण परमबीर सिंग यांनी दिलं आहे. परमबीर सिंग यांच्या स्पष्टीकरणामुळे हे प्रकरण चांगलंच तापणार आहे. तसंच परमबीर सिंग यांच्या स्पष्टीकरणावर मुख्यमंत्री कार्यालय काय उत्तर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.