‘लेटर बॉम्ब’प्रकरणी सुप्रिया सुळेंची सोनियांशी चर्चा!
मुंबई: परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस दलातील बदल्यांतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर आता महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते खडबडून जागे झाल्याचे दिसत आहे. या धक्क्यातून सावरत आता सर्व नेते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महाविकासघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप खूप आभारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता ही चर्चा नेमकी कशासाठी होती, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.