राज्यपालांच्या आक्षेपानंतरही विधानसभा अध्यक्ष निवडीवर ठाकरे सरकार ठाम !
मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडीवरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. दोघांमध्ये घटनात्मक अधिकारांवरून निर्माण झालेल्या वादात ही निवडणूक अडली आहे. सोमवारी दिवसभर वेगवान हालचाली झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र पाठवून अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी घेण्याचे स्पष्ट संकेत दिले.
अध्यक्ष निवडीवरून दोघे पुन्हा आमनेसामने आले आहेत. गुप्त मतदानाला मूठमाती देऊन आवाजी मतदानाने निवडणूक घेणे हे घटनाबाह्य ठरेल, असा इशारा देणारे पत्र राज्यपालांनी सरकारकडे दुपारी पाठविले. निवडीच्या कार्यक्रमास राज्यपालांची अनुमती सरकारने प्रस्तावाद्वारे मागितली होती. अधिवेशन मंगळवारी संपत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत राज्यपालांनी ही अनुमती दिली नसल्याने निवड होणार की नाही, याबाबतची अनिश्चितता कायम असतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सायंकाळी एक पत्र लिहिले. यात निवडणूक घेण्यावर सरकार ठाम असल्याचे सूचित केले.
विधिमंडळाच्या अधिकारांवर राज्यपालांच्या अतिक्रमणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सायंकाळपर्यंत उत्तर द्या, नाहीतर तुमची अनुमती गृहीत धरली जाईल, असे त्यात नमूद असल्याचे समजते. त्यामुळे राज्यपालांची अनुमती न घेताच सरकार ही निवड करणार असे चित्र आहे. अध्यक्षांची निवडीसाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, अन्य ज्येष्ठ विधिज्ञ यांच्याशी रात्री सरकारकडून सल्लामसलत सुरू होती. आघाडीतील तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ मंत्री सल्लामसलत करीत होते. सकाळी अंतिम निर्णय घेण्यात येईल. कोणताही कायदेशीर पेच निर्माण होणार नाही, याची खबरदारी राज्य सरकारकडून घेतली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज सर्वाचं लक्ष असेल ते विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर. कारण ह्याच निवडणुकीवरून राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात नवा संघर्ष उभा राहिलाय. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी ठाकरे सरकारनं राज्यपालांची रितसर परवानगी मागितलीय पण राज्यपालांनी निवड प्रक्रियेवर बोट ठेवत सरकारला कायद्यातल्या त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण तो अधिकारच राज्यपालांना नसल्याची भूमिका ठाकरे सरकारनं घेतलीय. ह्या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांची आजच्या निवडीचं काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
राज्यपालांनी जरी निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला असला तरीसुद्धा निवडणूक रद्द करावी अशी कुठलीही सुचना राज्यपालांनी दिली नसल्याचं ठाकरे सरकारच्या टॉपच्या मंत्र्यांचं म्हणनं आहे. त्यावरचा संभ्रम दूर करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी निवडणूक घ्यावी की नाही अशी विचारणा सरकारनं राज्यपालांकडे केल्याचं समजतं. त्यावर राज्यपाल काय उत्तर देतात याची सरकारला प्रतिक्षा आहे. पण राज्यपालांनी काहीच कळवलं नाही तर ठरल्याप्रमाणे आज निवडणूक पार पडेल अशी सरकारच्या वतीनं शक्यता वर्तवली जातेय.