![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/11/manipur.jpg)
इंफाळ – मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर अतिरेक्यांनी दबा धरून भ्याड हल्ला केला. हा हल्ला शनिवारी सकाळी १० वाजता शेखन-बेहिआंग पोलिस स्थानक परिसरामध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार ४६ आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर त्यांचे कुटुंबीय आणि क्यूआरटीसोबत जात असताना अतिरेक्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कमांडिंग अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह क्यूआरटीमध्ये तैनात असलेल्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. हे अमानवीय आणि दहशतवादी क्रृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकारचे भ्याड कृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. असा इशारा दिला आहे. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, क्विक रिअॅक्शन टीमसोबत अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यही या ताफ्यामध्ये होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ४६ एआर आसाम रायफल्सच्या ताफ्यावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. या हल्ल्यामागे मणिपूरस्थित पीपल्स लिबरेशन आर्मीचा हात आहे. दहशतवाद्यांनी कर्नल बिप्लब त्रिपाठी, त्यांची पत्नी आणि मुलासह काही जवानांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये कर्नल, त्यांची पत्नी आणि मुलगा, तसंच काही जवान असे एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात कर्नलसह ४ जवान शहीद झाले आहेत. मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील सिंघाट येथे हा हल्ला करण्यात आला.
मणिपूरच्या चुराचंदपूर येथे आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेला भ्याड हल्ला अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह असल्याचे ट्विट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. आसाम रायफल्सच्या सीओसह पाच शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य गमावले आहेत. राजनाथ सिंह म्हणाले की, मी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करतो. दोषींना लवकरच न्यायालयात उभे केले जाईल.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि आज शहीद झालेल्या जवानांना आणि कुटुंबीयांना मी श्रद्धांजली वाहतो, असे म्हटले आहे. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत.