मुंबई : राज्यातील मंदिरं खुली करावीत याकरिता भाजपाने नुकतेच ठिकठिकाणी शंखानाद आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती. या मुद्द्यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मंदिरं बंद असली तरी आरोग्य मंदिरं सुरू आहेत आणि ही आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे असे सांगत ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे.
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात कल्याण-डोंबिवलीतील कोपर पुलासह विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ठाकरे यांनी हे विधानं केलं आहे. पुढे ते म्हणाले की, धार्मिक मंदिरे बंद असली तरी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य मंदिरे मात्र आज सुरू आहेत. त्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देत असून धार्मिक मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोव्हिडंचा काळ अजून संपला नसून माझ्या पक्षांसह सर्व पक्षांना मी जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे. आपण जबाबदारीने वागलो नाही तर लोकं कसे वागतील? हे सुद्धा त्यांना मी समजावलं असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात टिप्पणी, राजकीय शेरेबाजी, चिमटे आणि शाब्दिक चकमकींमुळे ही विकासकामांपेक्षा आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे याची अधिक प्रचिती आली.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असणाऱ्या विकास कामांबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे तर केंद्र सरकारचा कोविड इनोव्हेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे यावेळी विशेष शब्दांत कौतुक केले.
फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल
कल्याण-स्कायवॉक फेरीवाला मुक्त हा महत्त्वाचा विषय आहे. ठाण्यात मध्यंतरती जी घटना घडली. महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे. त्यात महिला पोलीस देखील आल्या. जो कोणी कायदा हातात घेत असेल त्याच्या बाबतीत दया माया दाखवून चालणार नाही. फेरीवाल्यांच्या उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी कायदा राबवावा लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
…तर घोषणा देऊन काय उपयोग?
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यथा मांडली. मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासाकडे लक्ष द्यावे. निधी द्यावा. मंदिरे उघडी करावी, असे ते म्हणाले. या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्याची मंदिरे उभारणे गरजेचे आहे.” चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारत माता की जयच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आम्ही सुद्धा घोषणा देतो. मात्र ज्या भारत मातेच्या घोषणा दिल्या जातात. त्याच भारत मातेची मुले सोयी सुविधांपासून वंचित राहणार असतील तर केवळ घोषणा देऊन काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित केला. कल्याण डोंबिवलीचा विकासासाठी काय हवे आहे. एकदा या आणि बसा पूल, रस्ते, रुग्णालय काय हवे आहे. जनतेच्या सोयी सुविधांसाठी सर्व काही तयारी करण्याची तयारी आहे असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.
६५०० कोटीचा बॅकलॉग कशामुळे राहिला..?
आमदार चव्हाण यांनी बॅकलॉगचा मुद्दा यादरम्यान उपस्थित केला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी साडे सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. हा बॅकलॉग कशामुळे राहिला असा सवालही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांचा नामोल्लेख न करता उपस्थित केला.