कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईतून सुटणारी तेजस एक्सप्रेस १ महिना बंद
मुंबई : कोरोनाच्या (Corona virus) वाढत्या संसर्गामुळे रेल्वेच्या गाड्यांना फटका बसला असून भारतीय रेल्वेने मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान तेजस एक्स्प्रेसची सेवा एक महिन्यासाठी बंद केली आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोविडच्या (covid-19) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-अमहादाबाद दरम्यान धावणारी तेजस ट्रेन (82902/82901) २ एप्रिलपासून एक महिन्यासाठी बंद करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, ज्यांनी तेजस एक्स्प्रेसचे (Tejas Express) तिकीटे आरक्षण केली आहेत ती आता रद्द करण्यात आली आहेत. याबाबत प्रवाशांना माहिती देण्यात आली असून त्यांचे पैसे परत केले जातील. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर भारतीय रेल्वेने सर्व गाड्या रद्द केल्या आणि तेजस ट्रेन ऑक्टोबरपर्यंत बंद राहिली. मुंबई-अहमदाबाद तेजस रेल्वे ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरु करण्यात आली होती, परंतु प्रवासी कमी असल्याने नोव्हेंबरमध्ये ही गाडी पुन्हा बंद करण्यात आली. त्यानंतर यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी ही गाडी सुरु करण्यात आली होती.