विराट, रोहितची अर्धशतके; भारताचा टी-२० मालिका विजय
५ व्या सामन्यात इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव; टीम इंडियाचा सलग सहावा टी-20 मालिका विजय
अहमदाबाद : कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची ही मालिका ३-२ अशी खिशात घातली. या विजयासह भारताचा हा सलग ६ वा टी २० मालिका विजय ठरला.
पाचव्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने या सामन्यासाठी सलामीवीर लोकेश राहुलला संघातून वगळले. त्यामुळे रोहितच्या साथीने विराटने भारताच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी ८.६ षटकांत ९४ धावांची भागीदारी रचली. रोहितने अवघ्या ३४ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने सावध सुरुवात करणाऱ्या विराटने अंतिम षटकांत फटकेबाजी करत ५२ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या. त्याला सूर्यकुमार यादव (३२) आणि हार्दिक पांड्या (नाबाद ३९) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने २० षटकांत २ बाद २२४ अशी धावसंख्या उभारली.
मलान, बटलरचे प्रयत्न अपुरे
२२५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला भुवनेश्वर कुमारने खातेही न उघडता बाद केले. यानंतर डाविड मलान (६८) आणि जॉस बटलर (५२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर इतरांना फारसे योगदान देता आले नाही. त्यामुळे इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने १५ धावांत २ विकेट, तर शार्दूल ठाकूरने ४५ धावांत ३ विकेट घेतल्या. यासह भारताने 5 सामन्यांची मालिका 3-2 च्या फरकाने जिंकली. यासह टीम इंडियाचा हा नोव्हेंबर 2019 पासूनचा सलग 6 वा टी 20 मालिका विजय ठरला.
ऑस्ट्रेलियाला 2-1 ने धूळ चारली
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मालिका (India Tour Australia 2020-21) खेळवण्यात आली. या 3 सामन्यांच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव करत मालिका जिंकली. या सामन्यातील पहिले 2 सामने टीम इंडियाने जिंकले होते. तर शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया जिंकला होता.
न्यूझीलंडचा 5-0 सुपडा साफ
जानेवारी-फेब्रुवारी 2020 दरम्यान टीम इंडिया न्यूझीलंड (India Tour New Zealand 2020) दौऱ्यावर होती. या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळण्यात आली. टीम इंडियाने न्यूझीलंडचा त्यांच्याच घरात 5-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला.
श्रीलंकेवर 2-1 ने मात
टीम इंडियाची 2020 या नववर्षाची सुरुवात टी 20 मालिकेने झाली. टीम इंडियाने श्रीलंकेविरोधात (Sri Lanka Cricket) 3 सामन्यांची मालिका खेळली. या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला. यामुळे मालिका विजयासाठी दोन्ही संघाना उर्वरित 2 सामने जिंकणं बंधनकारक होत. मात्र टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकत मालिका जिंकली. यासह टीम इंडियाने टी 20 मालिका विजयाची हॅटट्रिक साजरी केली.
वेस्ट इंडिजवर 2-1 ने विजय
बांगलादेशविरोधात टी 20 मालिकेनंतर लगेचच टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरोधात (West Indies Cricket Team) 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळली. यामध्ये टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने सीरिज जिंकली. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. तर विंडिजने दुसरा सामना जिंकत पुनरागमन केलं. यामुळे मालिकेत दोन्ही संघांनी बरोबरी साधली. मात्र टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विंडिजला पराभवाची धूळ चारत मालिकेवर नाव कोरलं.
बांगलादेशवर 2-1 ने विजय
बांगलादेश (Bangladesh Cricket Team) विरुद्ध टीम इंडिया यांच्यात नोव्हेंबर 2019 मध्ये 3 सामन्याची मालिका खेळण्यात आली. या मालिकेतील सामने अनुक्रमे 3, 7 आणि 10 नोव्हेंबरला खेळण्यात आले. बांगलादेशने या मालिकेची विजयी सुरुवात केली. बांगलादेशने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र त्यानंतर टीम इंडियाने उर्वरित 2 ही सामने जिंकले आणि मालिका खिशात घातली.