Top Newsइतर

अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार; किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा इशारा

Tauktae Cyclone impact on Maharashtra after Low pressure over Arabian Sea

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. या दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात १५ ते १७ मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. हे चक्रीवादळ कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून १८ मे च्या संध्याकाळी मार्गक्रमण करेल. त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल.

चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर १५ ते १७ मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर १४ मे रोजी कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल.

शनिवार, दि. १५ मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. या चक्रीवादळादरम्यान समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेगही प्रचंड असेल. तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

चक्रीवादळाचे परिणाम :

मुंबई, ठाणे, पालघर – पावसाच्या हलक्या सरी; कोकण – मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा; रायगड – मोठा पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस; विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला

सुदैवाने कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून हे चक्रीवादळ पुढे जात असले तरी मुंबईला त्याचा धोका नाही. मात्र, मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यात चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. रायगड जिल्ह्यात मोठा पाऊस होईल. या काळात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहेत. तसेच वाऱ्याचा वेग ही प्रचंड असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button