रस्त्यावर उतरण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात बाजू मांडा; अशोक चव्हाणांचा मेटेंना टोला
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५ जून रोजी मोर्चा काढण्याची भूमिका दोन दिवसांपूर्वी विनायक मेटे घेतली. त्यावरुन आता अशोक चव्हाण यांनी विनायक मेटे यांना जोरदार टोला लगावला आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडली या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत मेटेंना टोला लगावला आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपसमितीचे अध्यक्ष तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, मराठा आकलन कालावधी दरम्यान ज्या युवकांची निवड झाली आणि काही नियुक्त्या रखडल्या आहेत त्यात बैठकीत आज चर्चा झाली. विनायक मेटे आणि संभाजीराजे यांच्या भूमिकेत फरक आहे. संभाजीराजे समाजाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर विनायक मेटे यांची भूमिका राजकीय असल्याचं दिसत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीडमध्ये ५ जून रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं विनायक मेटे यांनी जाहीर केलं आहे. यावर अशोक चव्हाण यांनी म्हटलं, रस्त्यावर उतरण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी. भाजप मुद्दाम आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी भाजण्याचे काम करू पाहत आहे असंही अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे.
मोर्चा होणारच : मेटे
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विनायक मेटे यांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाच्या मुद्यासंदर्भात ५ जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच आहे. या मोर्चाची संपूर्ण तयारी युद्धपातळीवर सुरू असून पाच तारखेला मोर्चा होणारच असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला होता.