पैसे भाजपचे घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा : ममता बॅनर्जी
बांकुरा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. भाजपचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल दौºयावर असून, विविध ठिकाणच्या रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे पायाला फ्रॅक्चर झाले असतानाही, ममता दीदी मागे हटताना दिसत नाहीएत. बंगालमधील बांकुरा येथे आयोजित रॅलीत ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पाठ म्हणून दाखवला. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना त्यांनी बंकुरा येथील सभेला व्हीलचेअरवरून उपस्थिती लावली. मागील एका सभेत ममता बॅनर्जी यांनी चंडी पाठ म्हणून दाखवला होता. तर, मंगळवारी झालेल्या बंकुरा येथील रॅलीत ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पाठ म्हणून दाखवला.
आमच्याशी टक्कर घ्यायला जाऊ नका, मातीत मिसळून जाल. ज्यांना दुखापत झाली असेल, त्यांनाच त्याचे दुखणे कळते, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. मी दररोज २५ ते ३० कि.मी. चालते. डॉक्टरांनी मला आराम करण्यास सांगितले आहे. परंतु, तरीही मी बसून राहिले नाही. कारण मी आराम केला, तर भाजप जनतेला जे दु:ख देईल, ते सहन करण्यापलीकडील असेल. ममता बॅनर्जी यांना रोखणे कठीण आहे, हे भाजपला माहिती आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला.
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका जाहीर करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही ममता बॅनर्जी यांनी टीका केली. भाजप आणि निवडणूक आयोगाचे हे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी चक्रीवादळ, कोरोना संकटात पश्चिम बंगालची योग्य पद्धतीने मदत केली नाही, असा दावाही त्यांनी केला.