दुबई : सर्वाधिक टी 20 विश्वचषक मिळवलेल्या वेस्ट इंडिज संघाचा यंदाच्या विश्वचषकातील प्रवास खडतर सुरु आहे. सुपर १२ फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्या दोन्ही सामन्यात वेस्ट इंडिज संघाला पराभवाची चव चाखायला लागली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने ६ विकेट्सने मात दिल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज संघाला ८ विकेट्सने पराभूत केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने आजचा सामना जिंकून ग्रुप १ मध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विंडीज सहाव्या क्रमांकावर आहेत.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रीका सामन्यात प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडीजने २० ओव्हरमध्ये केवळ १४३ धावाच केल्या. सलामीवीर एविन लुईसने ३५ चेंडूत ५६ धावा करत चांगली सुरुवात केली खरी, पण नंतर लेंडल सिमन्सच्या धिम्या खेळीमुळे संघ मोठी धावसंख्या करु शकला नाही. त्यांनी तब्बल ५६ डॉट चेंडू खेळले.
नाणेफेक जिंकून आफ्रिकेनं विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली. लुईस व सिमन्स यांनी पहिल्या तीन षटकांत अवघ्या ६ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांनी तुफान फटकेबाजी केली. या दोघांची ७४ धावांची भागीदारी कागिसो रबाडानं संपुष्टात आणली. लुईस ३५ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकार खेचून ५६ धावांवर माघारी परतला, केशव महाराजनं त्याची विकेट घेतली. त्यानंतर सिमन्स १६ धावांवर त्रिफळाचीत झाला अन् विंडीजचा डाव गडगडला. किरॉन पोलार्डनं २६ धावा केल्या. १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस गेल ( १२) माघारी परतला आणि त्यानंतर पुढील १५ चेंडूंत विंडीजचे पाच फलंदाज बाद झाले. विंडीजला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या. ड्वेन प्रेटॉरियसनं ३ व केशव महाराजनं २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात कर्णधार टेम्बा बवुमा ( २) पहिल्याच षटकात धावबाद झाल्यानंतरही आफ्रिकेनं धीर खचू दिला नाही. रिझा हेन्ड्रीक्स व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. हेन्ड्रीक्स ३० चेंडूंत ३९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डेर ड्युसेन व एडन मार्कराम यांनी अखेरपर्यंत खिंड लढवताना विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ड्युसेन ५१ चेंडूंत ४३ धावांवर, तर मार्कराम २६ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं ५१ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेनं १८.२ षटकांत २ बाद १४४ धावा करून विजय पक्का केला.