अबुधाबी : न्यूझीलंड संघानं सलग तिसऱ्या विजयाची नोंद करताना ग्रुप २ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंडनं सांघिक खेळ करताना नामिबियावर ५२ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडच्या ४ बाद १६३ धावांचा पाठलाग करताना नामिबियाला ७ बाद १११ धावाच करता आल्या. या सामन्यातील निकालाचा भारताला काहीच फायदा झालेला नाही.
नामिबियानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांनी न्यूझीलंडला जणू संधीच दिली. नामिबियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना किवी फलंदाजांना जखडून ठेवले. मागच्या सामन्यात ९०+ धावा करणाऱ्या मार्टिन गुप्तीलनं सुरुवात तर दणक्यात केली, परंतु दक्षिण आफ्रिकेचा माजी आणि नामिबियाचा आजी खेळाडू डेव्हिड विज यानं किवींना पहिला दणका दिला. त्यानंतर नामिबियाच्या गोलंदाजांनी टप्प्याटप्यानं विकेट घेतल्या. गुप्तील १८ धावांवर माघारी परतला. त्यापाठोपाठ दुसरा सलामीवीर डॅरील मिचेल ( १९) हाही बाद झाला. कर्णधार केन विलियम्सन व डेव्हॉन कॉनवे यांनी संयमी खेळ करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, केन फिरकीपटू गेरहार्ड इरास्मसच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला. बॅटची किनार घेत चेंडू यष्टींवर आदळला. त्याच षटकात गेरहार्डनं कॉनवेला ( १७) धावबाद केले. किवींचे ४ फलंदाज १४ षटकांत ८६ धावा करून माघारी परतले होते.
जेम्स निशॅम व ग्लेन फिलिप्स यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. निशॅम व फिलिप्स यांनी अखेरच्या पाच षटकांत १२च्या सरासरीनं धावा केल्या. निशॅम २२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारासह ३३ धावांवर नाबाद राहिला. फिलिप्सनं २१ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३९ धावा केल्या. न्यूझीलंडनं ४ बाद १६३ धावा केल्या.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. मिचेल व्हॅन लिंनगेन ( २५), स्टीफन बार्ड ( २१) आणि झेन ग्रीन ( २३) वगळता नामिबियाचे फलंदाज अपयशी ठरले. टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मिचेल सँटनर, जिमि निशॅम व इश सोढी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.