Top Newsस्पोर्ट्स

टी-२० विश्वचषक : गतविजेता वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर; श्रीलंकेचा २० धावांनी विजय

हीच ती वेळ!, डॅरेन ब्राव्होची निवृत्ती

अबुधाबी : गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान ऑफिशिअली संपुष्टात आले. श्रीलंकेनं दर्जेदार कामगिरी करताना विंडीजवर २० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजायाचा श्रीलंकेला फार फायदा झाला नसला तरी त्यांनी ५ पैकी दोन सामने जिंकून स्पर्धेचा निरोप घेतला. विंडीजचा आणखी एक सामना शिल्लक आहे आणि त्यात ऑस्ट्रेलियावर मात करून ते ग्रुप १मधील उपांत्य फेरीचं समीकरण बिघडवू शकतील. श्रीलंकेच्या एका खेळाडून आपली छाप पाडताना सर्वांना आश्चर्यचकीत केलं. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं आयपीएलमध्ये केवळ दोन सामने खेळवून बाकावर बसवलेल्या या खेळाडूनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद केली.

श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण देणं विंडीजला महागात पडले. श्रीलंकेचे सलामीवीर पथूम निसंका आणि कुसल परेरा यांनी ४२ धावांची भागीदारी केली. परेरा २१ चेंडूंत २९ धावांवर माघारी परतला. निसंका व चरिथ असलंका यांनी दुसऱ्या विकेटसाठी वेस्ट इंडिजला रडवलं. निसंका ४१ चेंडूंत ५ चौकारांसह ५१ धावांवर माघारी परतला. असलंकानं ४१ चेंडूंत ८ चौकार १ षटकारासह ६८ धावा केल्या. कर्णधार दासून शनाकानं १४ चेंडूंत नाबाद २५ धावा करून संघाला ३ बाद १८९ धावा करून दिल्या.

प्रत्युत्तरात ख्रिस गेल ( १) व एव्हिन लुईस ( ८) ही जोडी पुन्हा अपयशी ठरली. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १३ वेळा एकेरी धावांवर बाद होण्याच्या शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी गेलनं बरोबरी केली. रोस्टन चेसही ९ धावांवर माघारी परतला. निकोलस पूरन व शिमरोन हेटमायर यांनी कडवा संघर्ष केला, परंतु त्यांना विजय साकारता आला नाही. पूरन ३४ चेंडूंत ६ चौकार १ षटकारासह ४६ धावांवर माघारी परतला. हेटमारयला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. आंद्रे रसेल( २), किरॉन पोलार्ड ( ०) , जेसन होल्डर ( ८) व ड्वेन ब्राव्हो ( २) यांनी मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. हेटमायर ५४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ८१ धावांवर नाबाद राहिला. पण, त्याला विंडीजला ८ बाद १६९ धावांपर्यंतच नेता आले. श्रीलंकेनं हा सामना २० धावांनी जिंकला.

या सामन्यात बिनुरा फर्नांडो ( २-२४), चमिका करुणारत्ने ( २-४३) आणि वनिंदू हसरंगा ( २-१९) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. वनिंदूनं आजही प्रभावी मारा केला आणि त्यानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या. पुरष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच पर्वात सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हसरंगाच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यानं श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसचा १५ विकेट्सचा ( २०१२ ) विक्रम मोडला. हसरंगानं या स्पर्धेत ३० षटकांमध्ये १५६ धावा देताना १६ विकेट्स घेतल्या.

हीच ती वेळ!, डॅरेन ब्राव्होची निवृत्ती

वेस्ट इंडिजचा सुपरस्टार ड्वेन ब्राव्हो यानं गुरुवारी अखेर निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिजला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी श्रीलंकेकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर ब्राव्होनं ६ नोव्हेंबरला ग्रुप १ मधील अखेरचा साखळी सामना ( वि. ऑस्ट्रेलिया ) हा निरोपाचा सामना असेल असे जाहीर केले होते.

तो म्हणाला, मला वाटतं की ती वेळ आलीय. माझी क्रिकेट कारकीर्द समाधानकारक राहिली. १८ वर्ष मी वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केलं आणि या प्रवासात चढ-उतारही आले, परंतु मागे वळून पाहताना मी स्वतःला भाग्यवंत समजतो. आयसीसीच्या तीन स्पर्धा मी जिंकलो, त्यापैकी दोन या डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली जिंकलो. आम्ही ज्या काळात खेळलो त्यात जागतिक क्रिकेटमध्ये आम्ही स्वतःचे नाव गाजवू शकलो, याचा मला अभिमान आहे.

दोन वेळा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राव्होनं ९० ट्वेंटी-२० सामन्यांत ७८ विकेट्स आणि १००० हून अधिका धावा केल्या आहेत. २००४मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि एकूण २९३ सामने खेळला. शनिवारी तो विंडीजकडून २९४वा सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तो सामना त्याच्या कारकिर्दीचा निरोपाचा सामना आहे. २०१२मध्ये वेस्ट इंडिनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा ब्राव्होनं विजयी झेल टीपला होता. २०१६च्या विजयातही त्याचा सिंहाचा वाटा होता.

आता मी माझा अनुभव युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी वापरणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे भवितव्य उज्ज्वल आहे. त्यांना पाठींबा देत राहणे व प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. या वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरीची आम्हाला अपेक्षा नव्हती, असेही तो म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button