दुबई : भारतीय चाहत्यांनी आज खरंच घरातील टीव्ही नक्की फोडले असतील. आयसीसी स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धचे पराभवाचे चक्र टीम इंडियाला आजही भेदता आलं नाही. भारतीय फलंदाजांनी लाजीरवाणी कामगिरी केल्यानंतर गोलंदाजांसाठी काही करण्यासारखंच राहिलं नाही. केवळ नाईलाज म्हणून त्यांना गोलंदाजी करावी लागली. भारताचे फलंदाज आज कागदी ‘वाघ’ ठरले. या सामन्यातील सकारात्मक बाब म्हणजे टीम इंडियाला विकेट घेता आल्या आणि हार्दिक पांड्यानं गोलंदाजी केली. आता टीम इंडियाला अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.
इशान किशन व लोकेश राहुल ही नवी जोडी अपयशी ठरली. इशान किशन ( ४) तिसऱ्या षटकात माघारी परतला. रोहित शर्माला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो १४ धावांवर व लोकेश राहुल १८ धावांवर माघारी परतले. ४० धावांवर आघाडीचे तीनही फलंदाज माघारी परतल्यामुळे पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर जबाबदारी आली. धावा होत नसल्यानं विराट दडपणाखाली गेला. म्हणूनच त्यानं ११ व्या षटकात सोढीनं टाकलेला चेंडू उत्तुंग टोलावला, परंतु सीमारेषेवर ट्रेंट बोल्टनं त्याच ( ९) झेल टिपला.
मिचेल सँटनरला विकेट घेता आली नसली तरी त्यानं ४ षटकांत फक्त १५ धावा देत टीम इंडियावर प्रचंड दडपण निर्माण केलं होतं. हार्दिक पांड्याला आज पुरेपूर संधी मिळाली. रिषभ पंतकडून आज अपेक्षा होत्या, परंतु १२ धावांवर मिल्नेनं त्याचा त्रिफळा उडवला. इश सोढीनं ४ षटकांत १७ धावांत २ महत्त्वाच्या (रोहित व विराट) विकेट्स घेतल्या. तब्बल ७१ चेंडूंनंतर टीम इंडियाला प्रहिला चौकार मारता आला. मिल्नेनं ३० धावांत १ विकेट घेतली. हार्दिक २३ धावा करून माघारी परतला. शार्दूल ठाकूरही भोपळ्यावर बाद झाला. बोल्टनं २० धावांवर ३ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं नाबाद २६ धावा केल्या, भारताला ७ बाद ११० धावाच करता आल्या.
प्रत्युत्तरात, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चुका केल्या नाहीत. मार्टीन गुप्तीलनं १७ चेंडूंत ३ चौकारांसह २० धावांवर बाद झाला. २१.३ षटकांनंतर टीम इंडियाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिली विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराहनं ही विकेट घेतली. गोलंदाजीत फार कमाल करत नसूनही विराटनं वरुण चक्रवर्थीची चार षटकं झटपट पूर्ण करून घेतली. केन विलियम्सन व डॅरील मिचेल यांना सेट होण्याची त्यामुळेच संधी मिळाली. या दोघांनी संयमी खेळ करताना दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. मिचेल अगदी सहजतेनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना षटकार खेचत होता. केन व मिचेल यांनीच न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
जसप्रीतनं दुसरी विकेट घेताना मिचेलला बाद केले. मिचेल ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला आणि केनसह त्याची ७२ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. पण केननं खिंड लढवताना न्यूझीलंडचा सहज विजय मिळवून दिला. न्यूझीलंडनं हा सामना ८ विकेट्सनं जिंकला.
१८ वर्षांची पराभवाची परंपरा कायम….
२०२१ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप – न्यूझीलंडचा भारतीय संघावर ८ विकेट्स राखून विजय, दुबई
२०२१ जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल – न्यूझीलंडचा ८ विकेट्स राखून भारतावर विजय, साऊदॅम्प्टन
२०१९ वर्ल्ड कप उपांत्य फेरीत – न्यूझीलंडची १८ धावांनी भारतावर मात, मँचेस्टर
२०१६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप – न्यूझीलंडचा ४७ धावांनी भारतावर विजय, नागपूर
२००७ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप – न्यूझीलंडचा १० धावांनी भारतावर विजय, जोहान्सबर्ग
२००३ वर्ल्ड कप – भारताचा ७ विकेट्स राखून न्यूझीलंडवर विजय, सेंच्युरियन
कोहलीचे आत्मघाती निर्णय
भारतीय संघाला आज पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. भारताला ७ बाद ११० धावाच करता आल्या आणि न्यूझीलंडनं हे लक्ष्य सहज पार केलं. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे निर्णय चुकले आणि त्याचा फटका कुठेतरी टीम इंडियाला बसला. माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी समालोचन करताना या निर्णयाचे वाभाडे काढलेच, शिवाय माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानंही जोरदार टिका केली.
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियानं इशान किशन व लोकेश राहुल या जोडीचा प्रयोग केला, परंतु तो फसला. रोहित शर्माला जीवदान मिळूनही काही खास करता आले नाही.
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
भारतीय संघाकडून अत्यंत निराशाजनक खेळ झाला. त्यांची देहबोलीच पराजित योद्ध्यासारखी होती. चुकीचे फटके मारून त्यांनी स्वतःचा घात करून घेतला. न्यूझीलंडनं अप्रतिम कामगिरी करून टीम इंडियाचा पुढील फेरीत जाण्याचा मार्ग बंदच केला. भारतीय संघाला आता आत्मपरिक्षणाची गरज आहे, असे वीरूनं ट्विट केलं.
विराटचे फसलेले निर्णय अन् फलंदाजांचे अपयश…
आजच्या सामन्यात टीम इंडियात बदल होईल, हे अपेक्षित होते. पण, काहीच कामाचा नसलेल्या हार्दिक पांड्याला संधी देणं पुन्हा महागात पडले. १२व्या षटकापासून हार्दिक खेळपट्टीवर होता, पण त्याला केवळ २३ धावाच करता आल्या. आयपीएलमध्ये अखेरच्या ५ षटकांत ९० धावा कुटणारा हा फलंदाज आज गरज असताना ढेपाळला. त्यानं गोलंदाजी केली नाही अशी टीका होऊ नये म्हणून विराटनं त्याच्याकडून दोन षटकं टाकून घेतली.
रोहित शर्माच्या फलंदाजीच्या क्रमवारीत अचानक बदल करण्याचा डाव काहीच समजला नाही. रोहित पहिल्या सामन्यात भोपळ्यावर बाद झाला म्हणून याही सामन्यात तसंच होईल, असं नाही. तरीही महत्त्वाच्या लढतीत इशान किशन व लोकेश राहुल ही जोडी पाठवली. त्यातून निष्पन्न काय झालं, तर काहीच नाही. उलट इशान बाद झाल्यानं रोहितवरच दडपण आलं.
वरुण चक्रवर्थीकडून सुरुवातीची चार षटकं फेकून घेऊन मोहम्मद शमीला मागे ठेवण्यात कोणता शहाणपणा होता तेच कळेना. शमीला ७व्या षटकात पाचारण केलं गेलं आणि त्याआधी चक्रवर्थीची चार षटकं पूर्ण करून घेतली. रवींद्र जडेजानंही पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली.
फलंदाजांचे चुकीचे फटके टीम इंडियाला महागात पडले. संयमी खेळ व मैदानालगचे फटके मारूनही धावा करता येतात हेच भारतीय खेळाडू विसरले. त्यामुळे आत्मघातकी फटके मारून ते माघारी परतले.
भरवशाच्या म्हशीला टोणगा !
‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीची प्रचीती आजच्या सामन्यात टीम इंडियाला आली… करो वा मरो लढतीत टीम इंडियाच्या फलंदाजांकडून आज दमदार खेळीची अपेक्षा होती, पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी त्यांची हवाच काढली. संघात बदल केले, सलामीची जोडी बदलून पाहिली, विराट कोहलीनंही त्याचा फलंदाजीचा क्रम बदलला, परंतु हाती काय आलं? काहीच नाही. भारताचे हे दिग्गज ‘फुसके फटाके’ निघाले. या खेळपट्टीवर धावा करणे अवघड होते, परंतु अशक्य नक्कीच नव्हते. संयमाच्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज नापास ठरले. चुकीच्या फटक्यांनी टीम इंडियाचा घात केला.