भाजपमधून लढण्यासाठी स्वपन दासगुप्ता यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
नवी दिल्ली: स्वपन दासगुप्ता हे भाजपच्या तिकीटावर पश्चिम बंगालच्या तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून लढणार होते. भाजपने त्यांच्या नावाची घोषणाही केली होती. परंतु त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आल्याने त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी सभापतींना पाठवण्यात आला असून हा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. दासगुप्ता हे 2016पासून राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत.
पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपने चार खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यात राज्यसभा सदस्य स्वपन दासगुप्ता यांचाही समावेश होता. पण भाजपची ही खेळी त्यांच्याच अंगलट आली आहे. राज्यसभा सदस्याला विधानसभेची निवडणूक लढवता येते का?, असा सवाल तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने विचारला. त्यामुळे अखेर दासगुप्ता यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
या घटनेनंतर दासगुप्ता यांनी ट्विट करून त्यांचं म्हणणं मांडलं आहे. बंगालच्या लढाईत पूर्णपणे झोकून देण्यासाठी मी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. येत्या काही दिवसात मी तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.