राजकारण

‘सिडको’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुरेश लाड?

मुंबई : सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच असलेली पाहायला मिळत आहे. कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड, राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील आणि नामदेव भगत यांच्यात सिडकोच्या अध्यक्षपदासाठी जोरदार स्पर्धा आहे. सिडकोच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी कुणाची वर्णी लावणार, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

सिडको हे राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना वसाहत, मेट्रो, उरण नेरुळ रेल्वे, जेएनपीटी विस्तार, स्मार्ट सिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या कामी लागली आहे. त्यामुळे हे महामंडळ राष्ट्रवादीकडे जाणार असून सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार सुरेश लाड यांच्या नावावर एकमत होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आमदार सुरेश लाड यांचे संबंध चांगले असल्याने त्यांच्या नियुक्तीला विरोध नसल्याचे समजते. त्यामुळे पनवेल आणि उरण नवी मुंबईत या भागात राष्ट्रवादीची ताकद नसल्याने माजी आमदार सुरेश लाड यांना सिडको अध्यक्ष करून त्या भागात पक्षाला ताकद देण्याची रणनीती आखली असून तसेच लाड यांच्या पक्ष संघटनेच्या अनुभव लक्षात घेता त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे, अशी माहिती आहे.

माजी आमदार सुरेश लाड विरुद्ध आमदार महेंद्र थोरवे असा राजकीय संघर्ष सध्या कर्जत-खालापूरमध्ये सुरु आहे. आमदार थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यामुळे खासदार तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंद घेतल्याची समजते, त्यामुळे तटकरे आणि अजित पवार यांनी लाड यांना राजकीय ताकद देण्याकरिता सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रत्यन करताना दिसून येत आहे.

नवी मुंबई येथील सेनेचे नेते नामदेव भगत यांनी सिडको संचालक मिळण्याकरिता सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ते सुद्धा आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रयत्न दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील हे सुद्धा सिडको अध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे. आगरी समाजाचे नुकतेच प्रवेश केलेले भाजप नेते तसेच गणेश नाईक यांना उत्तर देण्याकरिता त्यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. येत्या १५ जूनपर्यत महामंडळ नियुक्त होणार असून महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे आहे, असा संदेश देण्याकरिता नियुक्ता केल्या जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button