औरंगाबाद: मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन कापणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे या आज औरंगाबादमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेट ईडीकडून होणाऱ्या कारवायांवर टीका केली. खोटेनाटे आरोप केल्यास त्यांचं कुटुंब कुठल्या अवस्थेतून जातात याचा विचार केला पाहिजे. तत्त्वाची लढाई आणि विरोध झाला पाहिजे. पण इतकी टोकाची कटुता निर्माण होता कामा नये. नोटीस दाखवा. छापा मारा आमचं काहीही म्हणणं नाही, असं सांगतानाच आमच्या अनिल देशमुख यांच्यावर सात वेळा छापा टाकला. इतक्या रेड असतात का? ईडी, सीबीआय सध्या एजन्सी नाहीत. त्यांच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला. माणूस आमच्याकडे असला की देशद्रोही आणि त्यांच्याकडे असला की धुवून निघतो, असा चिमटाही त्यांनी काढला.
ईडी कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? हे कोणत्या आधाराने बोलातात? हे काय सीपी किंवा आयजी आहेत की ईडीचे अध्यक्ष आहेत का? मग हे कसं बोलतात?, असा सवाल करतानाच पाच दशकात आमच्यावरही आरोप झाले. पण आमची तयारी आहे. इतकी कटुता येणं योग्य नाही. आमच्या विरोधात ट्रक भर पुरावे आणले, पण काय झालं? असा सवालही त्यांनी केला. प्रेस हाऊसवर सुद्धा रेड होते. त्यांना नोटीस दिली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणाऱ्यांनाही टोले लगावले.. १० विषयात एकच माणूस पारंगत आहे हे मला टीव्ही बघून कळतं. अफगाणिस्तान असो चायना असो अजिंठा वेरूळ असो की काहीही… कशावरही एकच माणूस चर्चा करतो. याला राजकारणी आणि मीडिया दोघेही ५० टक्के दोषी आहेत. ५ मिनिटांत १०० बातम्या? इतकं फास्ट. मी तर घाबरून टीव्ही बंद करते, असा चिमटा काढतानाच आमच्या घरात पेपर वाचण्याची परंपरा आहे. माझ्या वडिलांना जोपर्यंत पेपर वाचून हाताला काळी शाई लागत नाही, तोपर्यंत दिवस सुरू झाला असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.