पुणे: गेल्या काही कालावधीपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. यात आता आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली. यावरून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारले असता प्रवीण दरेकर यांच्या बोलण्यावर नकार दिला.
दरेकर शिरुर दौऱ्यावर होते. यावेळी दरेकर यांनी प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करण्यावरून राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी बोलताना हे विधान केले आहे. प्रवीण दरेकर यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर, याविषयी काहीही बोलणार नाही. माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
साकीनाका प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, साकीनाका येथील घटना अत्यंत दुर्देवी व वाईट आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आमच्या सर्वांची हीच मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पोलिसांना व संबंधित खात्याला आदेश दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मी आभारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.