सुनील पाटीलचे भाजपशी कनेक्शन, त्याचे आडनावही खोटे; अनिल गोटेंचा दावा
मुंबई/धुळे : आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांच्या एन्ट्रीमुळे नवा ट्विस्ट आला आहे. सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेला असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणात नवा दावा केला आहे. सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीशी संबंधित नाहीत. ते भाजपशीच निगडीत आहेत. सुनील पाटील यांचं पाटील हे आडनावही खरं नाही, असा दावा अनिल गोटे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे. सुनील पाटील हे राष्ट्रवादीत कधीच नव्हते. त्यांचा एखाद्या नेत्याशी संबंध असू शकेल. एखाद्याचे अनेक नेत्यांशी संबंध असू शकतात. २०१२-१३ मध्ये त्यांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. त्या दहीहंडीला ११ लाखांचे बक्षीस लावले होते. त्यापूर्वी कोणीच एवढं बक्षीस लावलं नव्हतं. ही दहीहंडी अॅरेंज करणारे सर्व लोक भाजपचे होते. आजही आहेत. आमचा काय संबंध त्यांच्याशी? या प्रकरणात चारही बाजूने भाजप अडचणीत आली आहे. त्यामुळे कुणावर तरी ढकलायचं म्हणून ते आमचं नाव घेत आहेत, असं गोटे म्हणाले.
सुनील पाटील यांचं खरं आडनाव पाटील नाही. त्यांचं खरं आडनाव चौधरी आहे. इथले जे गुंड आहेत. त्यांच्याशी यांचे संबंध आहेत. एक ग्राम… दहा ग्राम… शंभर ग्राम गांजा सापडला म्हणून अख्खा देश डोक्यावर घेतला जात आहे. अरे इथे तर शिरपूरला टनाने गांजा होता. १५०० एकर शेतीत गांजा लावला होता. त्यात ५०० एकर जमीन ही वनखात्याची होती. याच समीर वानखेडेंकडे त्याची मी तक्रार केली होती. लेखी तक्रार केली होती. दोन वेळा बोललोही त्यांच्याशी. तेव्हा वानखेडे इथे का आले नाही? कारण इथे सेलिब्रिटी नव्हती ना? पब्लिसिटी मिळाली असती, पण इतकी मोठी मिळाली नसती म्हणून वानखेडे आले नाहीत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. मी तुम्हाला आजही १५०० एकर जमिनीवर गांजा लावला होता त्याचे व्हिडिओ देऊ शकतो, फोटो देऊ शकतो आणि त्याचं संभाषणही देऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
आताही धुळ्यात मोठ्या प्रमाणावर गांजा सापडतो. त्यावेळी दोन ट्रक गांजा होता. पण कोणीही कारवाई केली नाही. गांजा प्यायला त्याला दोषी धरतात. शंभर ग्राम गांजा ठेवला त्याला दोषी धरतात. पण टनाने गांजा पिकवतात त्याला दोषी धरत नाही अशी विचित्रं अवस्था आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. एखाद्या व्यक्तीला ड्रग्ज घेताना पकडलं असेल तर त्याला नशामुक्ती केंद्रात पाठवायचं हा नियम आहे. त्यात नवीन काहीच नाही, असंही ते म्हणाले.