सचिन वाझेला राजकीय ‘बकरा’ बनवले; भाऊ सुधर्म वाझेंची हायकोर्टात धाव
मुंबई : सचिन वाझेंच्या कुटूंबीयांकडून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. सचिन वाझे यांचा भाऊ सुधर्म वाझे यांच्याकडून उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) ने माझ्या भावाला म्हणजे सचिन वाझेला ताब्यात घेऊन अटक केली. त्यामुळेच सचिनला हायकोर्टात सादर करण्याचे आदेश द्यावेत ही मागणी करणारी हेबियस कॉर्पस याचिका सचिन वाझे यांच्या कुटूंबीयांकडून हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी व्यक्तींनी सचिन वाझेला बळीचा बकरा बनवल्याचा दावाही कुटूंबीयांनी केला आहे.
दिवंगत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांना काही राजकीय पक्षातील मोठ्या नेत्यांकडून हाताशी धरण्यात आले. विमला हिरेना यांचा वापर करून सचिन वाझेला राजकीय बळीचा बकरा बनवण्यात आला आहे. पुरावे नसतानाही सचिन वाझेंना अॅंटिलिया प्रकरणात गोवले, असा उल्लेख सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे. सुधर्म वाझे यांनी याआधीच संपुर्ण प्रकरणात अनिश्चितता असल्याचे बोलून दाखवले होते. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतरही त्यांनी या संपुर्ण प्रकरणात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसारच आज सोमवारी सचिन वाझे यांच्या कुटूंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांची काही दिवसांपूर्वीच माझी भेट झाली होती. त्या भेटीच्या दरम्यान सचिन वाझे हे अत्यंत चिंताग्रस्त होते, अशी माहिती सुधर्म वाझे यांनी दिली होती. त्यांनी वॉट्स एप मॅसेजमध्ये जो मुद्दा मांडला, तोच मुद्दा त्यांनी कुटूंबीयांशी बोलतानाही सांगितला. काही वरिष्ठ अधिकारी मिळून मला या संपुर्ण प्रकरणात अडकवत आहेत, असा खुलासा सचिन वाझे यांनी आपल्या वॉट्स एप स्टेटसमध्ये केला होता. त्यानंतरच सचिन वाझे हे आपल्या जीवाला काही बर वाईट करून घेतील काय ? य़ा शंकांनी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पण संपुर्ण प्रकरणातच सचिन वाझे यांना झालेली एनआयएमार्फतची अटक, त्यानंतरची देण्यात आलेली एनआयएची दहा दिवसांची पोलिस कोठडी आणि एकुणच संपुर्ण प्रकरणात त्यांच्या सहकाऱ्यांची होणारी चौकशी पाहता राज्यातील पोलिस यंत्रणेवरच विरोधकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली आहे. सचिन वाझेंचा प्यादा म्हणून वापर झाला असून खरे सूत्रधार हे समोर यायचे आहेत, असा उल्लेख राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमवारी केला होता.