बारावी निकालाची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी-पालक चिंतेत
मुंबई : सीबीएसई मंडळाचा बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार, याची राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप काहीच स्पष्टता नसल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत पडले असून ते निकालाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.
बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते. आता सीबीएसई, आयसीएसई दोन्ही मंडळांकडून निकाल जाहीर झाल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशातील सर्व राज्यांनी बारावीचे निकाल ३१ जुलै २०२१ पूर्वी लावावेत, अशा सूचना होत्या. मात्र, राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता काही जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालये व शाळांना निकालाचे काम पूर्ण करण्यास मंडळाकडून विशेष वेळ देण्यात आला.
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि प्राचार्यांकडून अंतर्गत मूल्यमापन करण्याचे काम नुकतेच पूर्ण होत आहे. त्यानंतर मंडळ स्तरावरही निकालावर कार्यवाही अपेक्षित असल्याने निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.