मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, ऑनलाईन हवी या मागणीसाठी विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, उस्मानाबाद, मुंबई, औरंगाबादसह विविध शहरांत विद्यार्थ्यांसह काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करण्यात आली आहे. यु ट्यूबवर हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर हे विद्यार्थी ठिकठिकाणी जमले होते, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांनी नागपूरसह काही भागात हुल्लडबाजी केली. नागपूरमध्ये विटांद्वारे स्कूटल बसच्या काचा फोडण्यात आल्या. विद्यार्थांना पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी विद्यार्थ्यांची मागणी ही ऑफलाईन परीक्षा नको तर ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी होती. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याच्या प्रादुर्भावामुळे सर्व कार्यालयीन कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. मग, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून १० वी १२ वीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन का घेतल्या जात आहेत, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाचा धोका पाहता बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज नागपुरातील ट्रिलीयम मॉल मेडिकल चौकात आंदोलन केले. राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होवू शकतात. मग, १० वी, १२ वीच्या बोर्ड परीक्षासुद्धा ऑनलाईन व्हायला हव्यात, अशी मागणीपर विनंती या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा गेली २ वर्ष बंद आहेत. व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. परंतू, याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर पडला आहे. ऑनलाईन क्लासेस प्रत्येकाला अटेंड करणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुटला आहे, अशा विद्यार्थ्यांचा विचार करण्यात यावा, असेही या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून घेतल्या जाणार आहेत, हा विद्यार्थ्यांच्या जीवाला असणाऱ्या धोक्याचा इशारा आहे. ह्याबाबत देखील पुनर्विचार करावा, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे ‘हिंदुस्थानी भाऊ’चा हात
मुंबईतल्या धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनाला तोडफोडीचं गालबोट लागलं असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला आहे. धारावीत दहावी, बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांचा जमाव कसा झाला? त्यांना नेमकं कुणी बोलावलं होतं? याची माहिती विद्यार्थ्यांना विचारण्यात आलं असता अनेकांनी ‘हिंदुस्थानी भाऊ’चं नाव घेतलं आहे.
राज्यात केवळ धारावीतच नव्हे, तर नागपूर, सातारा, कराड इतर काही ठिकाणी देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे हे नियोजन करुन आंदोलन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच हिंदुस्थानी भाऊच्या इन्स्टाग्राम अकाऊंट देखील त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ धारावीत आंदोलनात सामील झाला होता आणि त्यानंच केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
…तर आज ही वेळच आली नसती; ‘हिंदुस्थानी भाऊ’ची प्रतिक्रिया
धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. अचानक झालेल्या गर्दीमुळे पोलिसांचीही भंबेरी उडाली. आंदोलन ठिकाणी ‘हिंदुस्थानी भाऊ’ या युट्यूब स्टारनं हजेरी लावल्यानंतर या विद्यार्थ्यांना जमा करण्यामागे त्याचा हात असल्याचं समोर आलं आहे.
‘हिंदुस्थानी भाऊ’नं आजच्या आंदोलनासाठी चिथावणीखोर वक्तव्य आणि आवाहन केल्याचे व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही आढळून आले आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनीही याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसंच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात खुद्द ‘हिंदुस्थानी भाऊ’ची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. मी कुठल्याही पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित नसून मी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर आलो. सरकारनं जर विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती, असं म्हणत शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा आपणच दिला होता याचीही कबुली दिली आहे.
मुलं आज त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर आली आहेत. मी कुठल्याही पक्षाशी किंवा संघटनेशी जोडलेलो नाही. मी फक्त विद्यार्थ्यांसाठी उभा आहे. गेल्या ३ महिन्यांपासून विद्यार्थी तणावात आहेत. याबाबतचे मेसेज मला मिळाले. दोन दिवसांपूर्वी आंदोलनासाठीचं आवाहन करणारा व्हीडिओ मी टाकला होता. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कारण सरकारनं त्याचं म्हणणं ऐकलं नाहही. त्याचं म्हणणं सरकारनं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. मी स्वत: उतरुन त्यांचा फक्त आवाज बनलो आहे. माझ्या मुलांनी कुणालाही त्रास दिलेला नाही, असं विकास पाठक ऊर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हणाला.
आंदोलनात चुकीची माणसे घुसली, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही : बच्चू कडू
दरम्यान, शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. कडू म्हणाले की, काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे हेच मत आहे, असे नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही चूकीचे लोकही असतील असे माझे मत आहे. याची आता चौकशी केली जाईल आणि आंदोलनातील मागण्यांवर चर्चाही करुन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन हे ठरवण्यासाठी कोणालाही सल्ला द्यायची गरज नाही. हे निर्णय शिक्षण विभाग घेईल, असंही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिक्षणाशी काहीही संबंध नसणारी काही चुकीची माणसं घुसली आहेत. या सर्वाच्या मागे कोण आहे याचा शोध घेऊ आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची योग्य चौकशी करू, त्यांच्या शालेय जीवनावर कोणताही दुष्पपरिणाम होऊ देणार नाही. तशा सूचना पोलिसांना देऊ, असं बच्चू कडू म्हणाले.
विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांसाठी सज्ज राहावे, उदय सामंतांचे आवाहन
कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घ्यावा लागला. आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये आपण प्रत्यक्ष सुरू करीत आहोत. १५ फेब्रुवारीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत; पण त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयात सोमवारी मंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी ऑफलाईन शिक्षणाची गरज आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईनचा नाईलाजाने आधार घ्यावा लागला. आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तरीदेखील स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी काही निर्णय घेऊ शकतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थी वर्गाबाहेर राहू नयेत म्हणून लसीकरणाचे शिबिर महाविद्यालयात राबवण्यात येणार आहेत, असेही मंत्री सामंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राचार्यांना खर्च करताना मर्यादा होत्या. त्या मर्यादाही वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तो निर्णय राज्यभरासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही बोगस पदव्या दिल्या जात असल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. याकडे मंत्री सामंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, तशा प्रकारची पुराव्यासह लेखी तक्रार माझ्याकडे कोणी दिली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?
मुंबईत आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. गर्दी एवढी जास्त होती की, पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मुंबईसारख्या ठिकाणी एवढी गर्दी तीही विद्यार्थ्यांची, त्यामुळे ठाकरे सरकारला घामटा फुटला नसता तरच नवल. पण मग हे सर्व विद्यार्थी आले कुठून, त्यांचं नेतृत्व नेमकं कुणी केलं? कुणाच्या आवहानावर ते जमा झाले असे अनेक प्रश्न पोलीसांना पडले, सरकारलाही पडले. आणि मग त्यातून हिंदुस्थानी भाऊचं नाव समोर आलं. कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ, त्याचं नेमकं नाव काय, तो करतो काय, कुठल्या पक्षाशी तो संबंधीत आहे असे अनेक प्रश्न फक्त सरकारच नाही तर मीडियालाही शोधावं लागलं. आणि त्याचाच शोध आम्हीही घेतला. विद्यार्थ्यांचं आदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधीच तिथे हिंदुस्तानी भाऊ आलेला. मात्र त्याला तिथे न थांबू देता पोलिसांनी तिथून बाहेर काढलं. त्यानंतरच हे आंदोलन आणखी आक्रमक झालं. या हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून काढल्यानंतर हिंदुस्तानी भाऊने एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे, तो व्हीडिओ आता चांगलाच वायरल होत आहे.
या हिंदुस्तानी भाऊचे नाव विकास पाठक असे आहे. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन १३ मध्येही दिसून आला होता. त्याआधी सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये तो अश्लाघ्य भाषा वापरण्यासाठी फेमस आहे. शिक्षमंत्र्यांनी माझं म्हणनं ऐकून घेतलं नाही असा आरोप विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊने केला आहे.
काय म्हणाला हिंदुस्तानी भाऊ?
त्यात तो आज तीन महिने झाले हे विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. त्यांचा आवाज विद्यार्थ्यांनी ऐकला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला, तर मी आज वाईट झालो का? कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकला. तुम्ही सर्व बैठका ऑनलाईन घेता, मग विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन का. हे विद्यार्थी देशाचं भविष्य आहेत. परीक्षा नको असं मी म्हणालोच नाही. फक्त ती परीक्षा पुढे ढकला. तसेच तीन महिन्यापासून विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. मी आज सरकारला आवाहन करतोय की परीक्षा पुढे ढकला. खेडेगावात आज हजारो विद्यार्थी आहेत. त्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेताच आलं नाही. लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना आवाहन केलं होतं. आता विद्यार्थ्यांनी मला आवाहन केलं की आमच्यासाठी उभे राहा म्हणून मी आज त्यांच्यासाठी उभा आहे. अशी प्रतिक्रिया त्याने आंदोलननंतर दिली आहे.
हिंदुस्तानी भाऊच्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी हिंदुस्तानी भाऊने यूट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन काल केलं होतं. त्यानंतर आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. धारावीमध्ये वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी शेकडो विद्यार्थी जमले. तसंच औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नागपूरमध्येही शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर टीव्ही 9 मराठीने हिदुस्तानी भाऊशी संपर्क साधला असता त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज तीन महिने झाले हे विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज त्यांनी ऐकला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला तर मी वाईट झालो का? असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केलाय.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका : नाना पटोले
विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, कॉलेज बंद असली तरी शिक्षणात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मविआ सरकारने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरुच ठेवलेले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्या पूर्ववत सुरु कराव्यात तसेच परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात अशी मागणीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी विचार करूनच सरकारने निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी व पालक यांना अजूनही काही शंका, समस्या असतील तर त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाऊ शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणे चुकीचे आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पुढे करत काही पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यावर राजकारण करणे अयोग्य आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना एमपीएससीच्या परिक्षेचा मुद्दा घेऊन अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून काही राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. या आंदोलनातून अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागणही झाली होती. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वात महत्वाचे आहे. सरकारने शिक्षणासंदर्भात सर्व स्तरातील लोक, विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ यांची मते विचारात घेतलेली आहेत असे असताना विद्यार्थ्यांच्या आडून राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, विद्यार्थ्यांना भडकवू नका, विद्यार्थ्यांनीही अभ्यासावर लक्ष द्यावे. मविआ सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी मी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
हिंदुस्तानी भाऊला विद्यार्थी आंदोलन प्रकरण भोवणार?
अगदी काही तासात विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर जमा होत रान पेटवलं. परीक्षा ऑनलाईन घ्याव्या या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड याच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. या आंदोलनात हाजारो विद्यार्थ्यांचा उद्रेक दिसून आला. मात्र या उद्रेकाला हिंदुस्तानी भाऊ जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊच्या अटकेची शक्यता आहे. या विद्यार्थ्यी आंदोलनाची चौकशी करावी असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आंदोलनाप्रकरणी हिंदुस्तानी भाऊवर गुन्हा दाखल होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. हिंदुस्थानी भाऊवर विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावल्याचा आरोप आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्याता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न करूनही आपलं ऐकूण न घेतल्याचा आरोप आधी हिंदुस्तानी भाऊकडून करण्यात आला.
या आक्रमक आंदोलनानंतर हिंदुस्तानी भाऊशी चर्चा करून असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडी यांनी दिलं आहे. तर उद्या बैठक घेऊ असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत, मात्र हिंदुस्तानी भाऊला अटक झाली तर ही चर्चा होणार का? असाही सवाल आता उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा निश्चितच विचार केला जाईल, काही विद्यार्थी आंदोलन करत असले तरी परीक्षा घ्या म्हणाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या मागणीचाही विचार करावा लागेल असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात आंदोलन करून नये असे आवाहन बच्चू कडू यांनी केलं आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे, हिंदुस्तानी भाऊशी माझं बोलणं झालं आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांनी शांत होऊन, आंदोलन थाबवणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. काही मुलं परीक्षा रद्द करा बोलत आहेत, तर काही मुलं ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रच्या ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत त्यांचाही विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून दिला. परीक्षा जास्तीत जास्त सोयीस्कर कशा होतील याचा विचार नेहमीच केला गेला. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार कधीही चर्चेला तयार आहे. त्यांनी यावं चर्चा करावी, त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आवाहन त्यांनी केलं आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्याचे मोठे नुकसान झाले आहे, याचाही विचार करावा लागेल. हे नुकसान वाढू नये, या परीक्षेनंतर सप्लीमेंटरी परीक्षा लवकरात लवकर कशा घेता येतील याचाही विचार सरकारने केल्याची माहिती त्यानी दिली आहे.