पुणे : राज्यातील सर्वांनीच कोरोना नियमांचं पालन केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली, तीही नियमांचं पालन करुनच केली आहे. कमीत कमी लोकांमध्ये कार्यक्रम पार पाडले पाहिजेत. लग्न किंवा इतर कार्यक्रमालाही किती लोकं असली पाहिजे, हे नियम ठरवले आहेत. या नियमाबाहेर असेल, तर ते मंत्री असू द्या किंवा सर्वसामान्य, सर्वांना नियम सारखेच, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तसेच, पुढील १०० ते १२० दिवस महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
ज्या नागरिकांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेत, त्यांनी टप्प्याटप्प्याने बाहेर पडायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण, अनेकांचं मत वेगवेगळं आहे, वैज्ञकीय क्षेत्रातील मान्यवरही वेगळं मत मांडत आहेत. काही मान्यवर असं मत माडतात की, इथून पुढे १०० ते १२० दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या, दिवसांत आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. लोकांनी नियमांचं तंतोलन पाल करायला हवं. मात्र, ग्रामीण भागात हे नियम पाळले जात नाहीत, मी नगर जिल्ह्यातील एका गावात गेलो होतो, तेथे मला नेहमीप्रमाणे वातावरण दिसलं, कुणीही मास्क घातला नव्हता, हे निष्काळजीपणा आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं.
लोकसंख्येच्या तुलनेनं लशींचा पुरवठा व्हायला हवा, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. त्यानंतर, बिहारपाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो. त्यातुलनेत लशींचे वितरण होत नसल्याने लसीकरणात लशींचा तुटवडा होत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. जुलै महिन्यात लसींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. पण, आज २१ तारीख असून आजपर्यंतही लस उपलब्ध झाली नाही. आपण दररोज १५ ते २० लाख लोकांना दररोज लस देऊ शकतो, एवढी आपली क्षमता आहे. पुणे जिल्ह्यातच १.५ लाखांपर्यंत लसीकरण होऊ शकतं. पण, तेवढी लशींची उपलब्धता झाली पाहिजे. विदेशातील लसींनाही मर्यादा पडतात, केवळ दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आनंदाची बाब ही आहे की लस घेण्यासाठी लोकं पुढाकार घेत आहेत, स्वत:हून पुढे येत आहेत. जे सुरुवातीच्या काळात लसीपासून दूर पळत होते, असे अजित पवार यांनी म्हटले.
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशात सहा वर्षांवरील वयाच्या ६७.६ टक्के नागरिकांमध्ये कोरोना विषाणूरोधी ॲंटिबॉडीज निर्माण झाल्याचे चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणात आढळल्याची माहिती ‘आयसीएमआर’ने दिली आहे. ४० टक्के जनता अजूनही असुरक्षित आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ‘आयसीएमआर’ने म्हटले. २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांत जून व जुलैमध्ये चौथे राष्ट्रीय सिरो सर्वेक्षण केले.