मुंबई : राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्वसामान्य नागरिकांसह यंत्रणांकडून मोठी बेफिकरी झाली होती. या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या लाटेनंतरच्या अनलॉक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध भूमिकेत असून त्यांनी प्रशासनाला आक्रमक सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसंच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत कोणतीच चर्चा झाली नाही, उलट कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या सूचना : कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका. रस्त्यावर फिरणारे नागरिक मास्क घालूनच फिरतील याची दक्षता घ्या. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या क्षेत्राला कंटेंमेंट झोन जाहीर करा. कंटेंमेट झोनमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन करा. गाव, वाड्या वस्त्यांवर लक्ष केंद्रीत करा. कोरोनामुक्त गाव संकल्पनेत चांगले काम होईल यादृष्टीने प्रयत्न करा
जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावं आणि परिपूर्ण आराखडा तयार करावा, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांसाठी कंपन्यांच्या समन्वयातून उद्योगस्थळानजीक फिल्ड रेसिडन्शीयल एरिया निश्चित करण्यास सहकार्य करावं, कामगारांना कामाच्या स्थळी जा-ये करण्यासाठी पाँईंट टू पॉईंट वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ऑक्सिजन निर्मितीसाठी तसंच उद्योग सुरळीत सुरू रहावेत यासाठी उद्योजक करत असलेल्या सहकार्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.