Top Newsफोकस

पावसाचे रौद्ररुप! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात कोसळ’धार’!

मुंबई : राज्यात पावसाने रौद्ररुप धारण केले असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, येत्या काही तासात सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात माथेरान, खंडाळा, महाबळेश्वर तसेच रत्नागिरी, अलिबाग परिसरात अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातही अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तिकडे विदर्भात देखील नागपुरातील काटोल, रामटेक आणि उमरेडमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. वर्ध्यातील हिंगणघाट, ब्रह्मपुरी, पुसद, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तानसा व मोडक सागर या धरणातून पाण्याचा विसर्ग

मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा व मोडक सागर या धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे तानसा नदीवरील खडवली गावातील पुल पाण्याखाली गेल्याने तसेच नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह अतिशय जास्त असल्याने पुलावरील रस्ता अक्षरशः उखडून गेला आहे.

रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील दामत येथे उल्हास नदीच्या प्रवाहात मध्यरात्री वडील आणि मुलगी वाहून गेले असून त्यांचे शोधकार्य सुरू आहे. इब्राहीम मुनियार वय ४० वर्षे आणि झोया मुनियार (वय ५ वर्ष) हे नदीच्या प्रवाहात वाहून गेलेत. नदीच्या बाजूच्या घरात पाणी शिरल्याने कुटुंबीय घराबाहेर पडले होते. दोन भाऊ आणि आईला वाचविण्यात यश आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक

गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा सांगितला आहे. राज्यात रेड, ऑरेंज अलर्ट दिला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता तिरमणवार आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली. बैठकीत वाढलेल्या नद्यांच्या पातळीबाबत माहिती देण्यात आली.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वशिष्ठी नदीला पूर येऊन नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास ५ हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळूण तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी शिरलं आहे. इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदिरातही पाणीच पाणी आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

चिपळूण बस स्थानक पाण्याखाली

चिपळूणमधील गावात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, बस स्थानकातील बस पूर्णपणे पाण्यात बुडून गेल्याचं दिसून येत आहे. त्यासोबतच, शहरातील अनेक ठिकाणच्या चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. अतिमुसळधार पावसाचा मोठा तडाखा कोकणाला बसला असून रत्नागिरी जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागत आहे. चिपळूण, खेडसह ज्या ज्या भागात खाड्या आहेत, त्या त्या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. चिपळूणमध्ये बस स्थानक पाण्याखाली गेलं असून अक्षरश: बस पाण्यात बुडाल्या आहेत. तर, चिपळूण नगरीत स्वागताची कमानही पाण्यात बुडालेली दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडि व्हायरल होत आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला अतिमुसळधार पाऊस पडल्याने खेडच्या जगबुडी नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. समुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो, हा आजवरचा अनुभव आहे. खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते आणि पुराचे पाणी काही तासातच ओसरते. गुरुवारी मात्र अस्मानी संकटाने कहर केला. रात्री अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येऊ लागले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने दणका दिला.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तिलारी धरण आणि कर्ली, वाघोटनमधील पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज असून सावधानतेचा इशारा दिला आहे. कणकवली येथील गड नदीमधीलही पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काही ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. करुळ आणि भूईबावडा घाट बंद असून फोंडा आणि आंबोलीमार्गे अजून वाहतूक सुरू आहे. आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने नागरिकांनी सतर्क रहावे.

सांगली

सांगलीच्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी आठ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आठ तासात ७५ मिलिमीटर पाऊस येथे बरसला. तर गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालीय. परिणामी आज दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडून ४ हजार ८८३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रातून ११२५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून सहा हजार आठ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. मुसळधार पाऊस तसेच धरणातील मुख्य दरवाजातून तसेच वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात तसेच चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग कोणत्याही क्षणी आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हे धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीचे पाणी पात्राबाहेर रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहत असुन नदीकाठच्या शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

सातारा

महाबळेश्वर तालुका आणि कोयनेला प्रत्येक वर्षी पावसाची बॅटिंग पहायला मिळत असते. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील लामज असं गाव की जे एबीपी माझाने प्रशासकिय यंत्रणेच्या डायरीवर आणण्यासाठी भाग पाडलं. आणि राज्यातील लोकांनाही समजले की सर्वाधिक पाऊसाची नोंद ही लामज या गावातही होत असते. पावसाळ्यात सर्वाधिक पाऊसाची नोंद महाबळेश्वरच्या माथ्यावरची होत असते. या नोंदीवर या तालुक्याचे भवितव्य ठरवलं जात. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील अशीही काही गाव आहेत की, त्या ठिकाणचा पाऊस म्हणजे त्या गावातील लोकांसाठी जणू मृत्यूच दरवाजावर येऊन ठेपला आहे. कारण पावसाळा सुरु झाल्यापासून आज अखेर जवळपास चार हजार मिलीमिटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहेच. तर गेल्या चोविस तासात जवळपास पाचशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बुलढाणा

अकोला व अमरावती परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी असणाऱ्या पूर्णा नदीला महापूर आला असून काही वेळात जिल्ह्याचा संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याशी संपर्क तुटू शकतो. जिल्ह्यात आज दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी मात्र पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात मात्र शेतीच नुकसान झालंय. खिरोडा गावाजवळ असलेल्या शेगाव संग्रामपूर मार्गावरील पुलाला आता पाणी लागलं असून काही वेळात या मार्गावरील वाहतूक बंद होऊ शकते.

पुणे

खडकवासला धरण १०० टक्के भरल्यानंतर आता मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत या धरणातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने पूर्ण समृद्धीने वाहू लागले आहे. या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात २४६६ क्युसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आले आहे.

डेक्कन क्वीन उद्या सकाळी धावणार नाही

पुणे-मुंबई धावणारी डेक्कन क्वीन उद्या सकाळी धावणार नाही. लोणावळा ते कर्जत दरम्यान अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने आणि रेल्वे मार्गखालील भाग वाहून गेल्याने असा निर्णय घेण्यात आलाय. डेक्कन क्वीन आज सायंकाळी पाच वाजता मुंबईवरून पुण्याकडे रवाना होते. पण तिथून ती आज धावणार नसल्याने उद्या ती पुण्यातून मुंबईकडे धावणार नाही हे स्पष्ट झालंय. तशी माहिती पुणे रेल्वेने दिली आहे.

कसारा रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या एक्सप्रेस गाड्या नाशिकच्या दिशेने रवाना

मागील १४ तासांपासून कसारा रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या एक्सप्रेस गाड्या आता नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात येत आहेत. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कसारा इगतपुरी मार्ग वरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. मात्र त्यातील डाऊन मार्गावरील एक लाईन सुरू करण्यात आली आहे. या लाईनहुन पंजाब मेल एक्सप्रेस आणि त्यानंतर मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात येत आहेत . अप मार्गावरील वाहतूक अजूनही बंद असून या मार्गावर काम सुरू आहे.

कल्याणसह नजीकच्या भागात बत्ती गुल

संततधार पावसामुळे पाणी साचल्याने कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत जवळपास १७ हजार ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला होता. बारावे येथून निघणारा मुरबाड रोड फिडर हा प्रेम ऑटो सर्कल, शहाड, योगीधाम, घोलप नगर भागात पाणी साचल्याने या परिसरातील ८० रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करण्यात आले. तेजश्री येथून निघणारा पौर्णिमा फिडरवरील पौर्णिमा सर्कल भागातील ९ रोहित्र बंद ठेवण्यात आले. मोहने फिडरवरील २० रोहित्र बंद ठेवण्यात आले.

कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत सरळगाव फिडरवरील ४० रोहित्र बंद ठेवण्यात आली असून परिसरातील १९ गावे आणि ५३०० ग्राहकांचा वीजपुरवठा बाधीत झाला आहे. शहापूर फिडरवरील २० रोहित्र बंद ठेवण्यात आली असून ११ गावे व १८०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. किन्हवली फिडरवरील ६७ रोहित्र बंद ठेवण्यात आली असून ३४ गावे व ४५०० ग्राहक बाधित झाले आहेत. कोन, पिंपळघर, म्हारळ, गोवेली, कांबा परिसरातील ६०० रोहित्र बंद असून ४० गावे व ९० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम, बाजारपेठ वांगणी येथील १३० रोहित्र बंद असून ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. उल्हासनगर-३, शांतीनगर, करोतिया नगर, स्मशानभूमी, भालेराव व रोकडे नगर भागातील १८ रोहित्र बंद असून ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.पाणी पातळी कमी होईल त्यानुसार बाधित क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत असल्याचे महावीतरणाकडून सांगण्यात आले आहे.

भिवंडीत शेकडो घरात शिरले पावसाचे पाणी

भिवंडीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती; शेकडो घरात शिरलं पावसाचं पाणी; शहरातील दोन हजारांहून अधिक, तर ग्रामीण भागात तीनशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

कसारा गावात माळीणची पुनरावृत्ती

शहापुर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ६ घरांवर डोंगरातील माती दरडींचा मलबा कोसळल्याने कसारा माळीण गावात झालेल्या दुर्घटनेकडे वाटचाल करित असल्याचे चित्र दिसले. सुदैवाने ६ घरातील सर्व लोक बाहेर पळाले म्हणून बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मध्य रेल्वे मार्गावर २१ ठिकाणी रुळांखाली भूस्खलन

मध्य रेल्वेच्या टिटवाळा-इगतपुरी आणि अंबरनाथ-लोणावळा मार्गावरील घाटात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे कडे कोसळले, रेल्वे रूळ वाहून जाणे, रुळावर माती साचणे, जलभराव, झाडे पडणे, ओएचई व सिग्नल पोस्टचे नुकसान इत्यादीमुळे दोन्ही विभागांवरील रेल्वे सेवा प्रभावित झाली. दक्षिणपूर्व घाटावर सुमारे २१ ठिकाणी भूस्खलन / पावसाच्या अडथळ्यांची ज्यात ३ ठिकाणी जास्त प्रमाणात क्षति झाल्याची नोंद झाली. २०० मजुरांसह ४ जेसीबी आणि २ पोकलेन क्षतिग्रस्त ठिकाणी पोहोचले आहेत आणि युद्धपातळीवर काम करत आहेत. पाणी भरणे, रुळाखालील माती वाहून जाणे, भूस्खलन, घाटा मध्ये कडे कोसळणे, नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहणे इत्यादीमुळे सुमारे २१ ठिकाणी अडथळे निर्माण झाले होते. सुमारे ४३०० घन मीटर रुळाखालील माती वाहून गेली. सुमारे १९०० घन मीटर एवढे भूस्खलन व दरडी कोसळल्या. विविध ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचा मागोवा: एकूण ९५० कामगार, सुपरवायझर ७५ आणि अधिकारी ३८ अविरतपणे रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी कार्यरत आहेत.

उल्हासनगरात पूरग्रस्तांचे मोठे हाल

उल्हासनगर शहरातील वालधुनी नदी किनाऱ्यावरील मीनाताई ठाकरेनगर, प्रबुद्धनगर, करोतीयानगर आदी परिसरतील शेकडो जणांना उल्हास नदीच्या ब्लॅक पाण्याचा फटका बसला. शेकडो जणांच्या घरात पाणी घुसल्याने, त्यांच्यात एकच धावपळ उडाली. लहान मुले, वृद्ध, महिला आदींना आपत्कालीन पथकांच्या जवानांनी बोट रबरी ट्यूबने बाहेर काढण्यात आले. उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा सर्वाधिक धोका किनाऱ्यावरील झोपडपट्टीला असतो. मात्र बुधवारी रात्री २ वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, दुर्गानगर आदी परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान उल्हास नदीचे काळे पाणी वालधुनी नदीत आल्याने करोतीयानगर, प्रबुद्धनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरे नगरात घुसल्याने, नागरिकांत पळापळ सुरू झाली. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला पुराचे पाणी झोपडपट्टी परिसरात घुसल्याची माहिती मिळताच, पथकाने धाव घेऊन पुरात अडकलेल्या वृद्ध, महिला, लहान मुलासह नागरिकांना बाहेर काढण्यात आले. महापालिका शाळे मध्ये बेघर झालेल्या नागरिकांना ठेवण्यात आले.

महाड शहर पूर्ण जलमय

महाड बाजारपेठेत सरासरी सहा सात फुटापेक्षाही अधिक पुराची पातळी आहे. महाड नगरपरिषदेच्या मुख्यालयात पाणी शिरले. महाड नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून आत्तापर्यंत दोनशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेले आहे. पावसाचा जोर कमी आहे मात्र महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे सावित्री नदीची पातळी वाढतच आहे.

बदलापूर शहरात उल्हास नदीला पूर; राज्य महामार्ग आणि रेल्वे सेवा ठप्प

बदलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बदलापूर गावाकडे जाणार उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर बदलापूर – कर्जत रास्ता देखील पाण्याखाली आला होता. त्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली आल्याने कर्जत आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button