पुणे: महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत राज ठाकरे यांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला होता. मात्र, राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना तुर्तास भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करु नका, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे पुण्यातील मनसे-भाजप युतीचा मुद्दा सध्यापुरता निकालात निघाल्याचे मानले जात आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही बाब राज ठाकरे यांच्या कानावरही घातली होती. परंतु, राज ठाकरे सध्या अत्यंत सावधपणाने पावले टाकताना दिसत आहेत.
पहिली युती पालघर जिल्ह्यात जाहीर
पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे.