मुंबई : राज्य विधिमंडळाचे आजपासून सुरु होणारे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इत मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची महाविकास आघाडी सरकारने केलेली तयारी बघता अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अन् गदारोळाचेच वातावरण असेल, असे चित्र आहे.
पुरवणी मागण्या आणि विधेयके हे कामकाज मुख्यत्वे यावेळी असेल. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेतलीच पाहिजे यासाठी काँग्रेस अडून बसली तरच निवडणूक होईल. ईडीची कारवाई, काही मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, मराठा व ओबीसी आरक्षण आदी मुद्द्यांवरून अधिवेशनात सत्तापक्ष व विरोधक आमने-सामने असतील.
दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन सरकारने लोकशाहीला कुलूप लावले असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला असून आता या सरकारविरुद्ध रस्त्यावरचीही लढाई लढू असे सांगितले. तर केवळ गोंधळातच अधिवेशन संपावे असे विरोधकांना वाटते. महाराष्ट्राच्या हिताची एवढीच काळजी असेल तर अधिवेशन शांततेत होऊ द्या असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद टाळली
मराठा, ओबीसी आरक्षण, एमपीएससी परीक्षा तसेच इतर अनेक प्रश्नांवरुन राज्यातील वातावरण तापलेलं असताना पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधणं टाळलं. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेणं टाळलं आहे. त्यांच्या या कृतीनंतर आता राज्यात अनेक चर्चेला उधाण आलं आहे.
आमचा नेता लय पावरफुल!!!
तिथे..
मुख्यमंत्री आज झाले गुल!!!
😂😂😂 pic.twitter.com/wRlvyDbqyM— Nitesh Rane (@NiteshNRane) July 4, 2021
प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधतात. यावेळी पत्रकारंनी विचारलेल्या प्रश्नांचीही ते उत्तरं देतात. अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेण्याची प्रथा आहे. मात्र, याच प्रथेला फाटा देत ठाकरे यांनी पत्रकार परिषद टाळली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरेंनी पत्रकार परिषद टाळल्याननंतर भाजप नेते नितेश राणे यांनी खोचक टीका केली आहे. त्यांनी “आमचा नेते पावरफूल…मुख्यमंत्री झाले गुल,” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद तसेच रिकामी खुर्ची असलेल्या पत्रकार परिषदेचा फोटो पोस्ट केला.