मुंबई : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. वांद्रे कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत दणका दिला आहे.
गावागावात धावणारी लालपरी अर्थात एसटी बसची चाकं गेल्या दोन महिन्यांपासून रुतलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात काही ठिकाणी फूट पडली आहे. त्यामुळे काही कर्मचारी हे कामावर परतले आहे. पण अजूनही काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहे. या संपाच्या विरोधात एसटी महामंडळाने वांद्रे कामगार न्यायालयात धाव घेतली होती. कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर ठरवला आहे. एसटी बस ही लोकोपयागी सेवा आहे. पण संप करण्याआधी किमान ६ आठवडे नोटीस द्यावी लागते. पण, कामगारांकडून अशी कोणताही नोटीस दिली गेली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे, असा निर्णय वांद्रे कामगार न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, १० जानेवारी रोजी एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर कामगार संघटनेनं संप मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अनेक आगारात कर्मचारी कामावर परतले आहे.
लालपरी रस्त्यावर आली असून २५० डेपोतील २१५ डेपो सुरू आहे. २६५०० कर्मचारी कामावर हजर झाले आहे. ९२ हजारातील ३१२३ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. आणि सध्या ८८ हजार कर्मचारी पटावर यातील २६५०० कर्मचारी आहे. राज्यात दिवसभरात लालपरीच्या ७ हजार फेऱ्या सुरू असून ३ लाख ८८ हजार प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
२ महिन्यांपासून संप सुरू, दररोज रुजू होणाऱ्या कर्मचारी संख्येत वाढ होत आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची कोणतीही प्रक्रिया नाही, निलंबित कर्मचाऱ्यांना ३ वेळा आवाहन केलं जे कामावर आले त्यांचं निलंबन रद्द केलं. लोकांना सेवा देणं आवश्यक असल्यानं ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेतलंय, ही नियुक्ती १ महिन्यांसाठी आहे. चंद्रपूर, वर्धा, अकोला, बीड, अमरावती, नाशिक, पुणे, बीड येथे खासगी कर्मचारी कामावर आहे. सेवानिवृत्त ४०० कर्मचारी सेवेत येण्यास इच्छुक आहे. यातील वय ६२ पर्यंतचे १०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मेडिकल, फिटनेस चेक करून कामावर घेतलं जातंय, असंही चन्ने यांनी सांगितलं होतं.