आता क्रिकेटपटूंसाठी श्रीलंकन बोर्डाचे नवे नियम
कोलंबो : श्रीलंका क्रिकेट बोर्डात सध्या सारंकाही आलबेल नाही अशीच परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने फिटनेससंबंधी काही नियम केले. त्यानंतर लंकेचा ३० वर्षीय क्रिकेटर भानुका राजपक्षे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. कालच सलामीवीर दनुष्का गुणतिलका यानेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने क्रिकेटर्सच्या निवृत्तीसंबंधी काही नवे नियम जाहीर केले. श्रीलंकन क्रिकेटर्सपैकी ज्यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे किंवा निवृत्तीचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी श्रीलंकन क्रिकेटने काही कठोर नियम तयार केले आहेत. प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती देण्यात आली.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने क्रिकेटर्स संबंधी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
१. आंतरराष्ट्रीय खेळाडूला जर निवृत्तीची घोषणा करायची असेल तर त्यांना तीन महिने याबद्दल क्रिकेट बोर्डाला नोटीस द्यावी लागणार आहे. क्रिकेटपटू नोटीस पिरियडनंतरच निवृत्ती स्वीकारू शकेल.
२. निवृत्ती स्वीकारल्यानंतर इतर देशांच्या टी२० आणि इतर फ्रँचायजी लीग क्रिकेट स्पर्धांमध्ये लगेच खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. निवृत्ती स्वीकारून झाल्यानंतर किमान सहा महिन्यांचा कालावधी पार पडल्यानंतर बोर्डाकडून एनओसी दिली जाईल आणि त्यानंतर त्यांना बाहेरील स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल.
३. श्रीलंकेतील देशांतर्गत क्रिकेट कंरडक स्पर्धांमध्ये ज्या निवृत्त खेळाडूंनी ८० टक्के सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले असेल अशाच खेळाडूंनी लंका प्रिमियर लीगसारख्या स्पर्धांसाठी पात्र ठरवलं जाईल.