आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एस. एच. सातभाई यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ईडीने आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ईडीने अनेकवेळा धाडी टाकल्या आहेत.
आनंदराव अडसूळ यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर अडसूळ यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी उच्च न्यायालयाने त्यांना कोणतीही सवलत न देता मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अडसूळ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात अटकपूर्व जामीन अर्जावर जोवर सुनावणी पूर्ण होत नाही तोवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज केला होता. त्या अर्जावर आज कोर्टाने निर्णय दिला. कोर्टाने अडसूळ यांचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र, कायमस्वरुपी अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज सुनावणीसाठी कायम ठेवला आहे. त्यावर २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल. या अर्जावर ईडीला तत्काळ उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.