केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने भारताला पराभूत करत सलग तिसरा विजय मिळवताना भारताला ‘व्हाईटवॉश’ दिला आहे. केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात द. आफ्रिकेने भारतावर ४ धावांनी मात केली. शतककवीर क्विंटन डीकॉक आफ्रिकेच्या या विजयाचा हिरो ठरला. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने भारतासमोर २८८ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाला पेलवलं नाही. टीम इंडिया ४९.२ षटकांमध्ये सर्वबाद २८३ धावांपर्यंत मजल मारु शकली. या विजयासह द. आफ्रिकेने उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली आहे. याआधीत उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेली कसोटी मालिकाही दक्षिण आफ्रिकेने २-१ अशा फरकाने जिंकली होती.
अष्टपैलू दीपक चहरच्या झुंजार खेळीनंतरही भारताला मालिकेतील शेवटच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रथम फलंदाजी करताना क्वींटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर आफ्रिकेने २८७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि विराट कोहलीने अर्धशतके केली होती. त्यानंतर योग्य वेळी दीपक चहरने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकात ५ चेंडूत ५ धावा हव्या असताना युजवेंद्र चहल झेलबाद झाला आणि भारताला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
२८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल ९ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि शिखर धवन या दोघांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी मिळून ९८ धावांची भागीदारी केली. शिखर धवन अर्धशतक (६१) झळकावून बाद झाला. ऋषभ पंत पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. नंतर विराटने डावाला गती दिली. पण तोदेखील अर्धशतकी खेळी (६५) करून माघारी परतला. सूर्यकुमार यादव (३९) आणि श्रेयस अय्यर (२६) यांच्याकडे छाप पाडण्याची संधी होती, पण ते दोघे बेजबाबदार फटके खेळून माघारी परतले. त्यानंतर दीपक चहरने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन झुंज दिली. त्याने ५४ धावांची खेळी केली. पण भारताला १० धावा हव्या असताना तो बाद झाला. त्याच्यानंतर मात्र आफ्रिकन गोलंदाजांनी चलाखीने गोलंदाजी करत भारताला मात दिली.
तत्पूर्वी, आफ्रिकेच्या डावाची सुरूवात खराब झाली. नव्याने संधी मिळालेल्या दीपक चहरने झटपट दोन बळी टिपले. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ३ बाद ७० होती. पण त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि रॅसी वॅन डर डुसेन यांनी १४४ धावांची भागीदारी केली. डी कॉकने १२४ तर डुसेनने ५२ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतरही मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी छोट्या मोठ्या भागीजाकी करून संघाला २८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताकडून प्रसिध कृष्णाने ३, चहर आणि जसप्रीत बुमराहने २-२ तर युजवेंद्र चहलने १ बळी टिपला.
बेजबाबदार फटके आणि चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी ; केएल राहुल
सामन्यानंतर मालिका पराभवाबाबात केएल राहुलने आपलं मत व्यक्त केलं. त्यावेळी त्याने दीपक चहरबद्दलही भावना व्यक्त केल्या. दीपक चहरच्या खेळीमुळे आम्हाला सामना जिंकण्याची संधी मिळाली होती पण आम्हाला विजय मिळवता आला नाही. सामना खूपच अटीतटीचा झाला. सामना हारल्याचं नक्कीच आम्हा साऱ्यांना दु:ख आहे. सामना पाहणाऱ्यांना सगळ्यांनाच आम्ही कुठे चुकलो ते माहिती आहे. फलंदाज म्हणून आम्ही काही बेजबाबदार फटके खेळले आणि त्यामुळे आम्ही संधी गमावली. आमच्या गोलंदाजांनीही चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर अजिबातच दबाव निर्माण झाला नाही आणि म्हणूनच आम्ही मालिका हारलो, अशा भावना राहुलने व्यक्त केल्या.
चूक मान्य करत काही गोष्टींची प्रामाणिक कबुली
आता आम्हाला एक गोष्ट नीट समजली आहे की आमच्या काय काय चुका झाल्या आणि आता आम्हाला कोणत्या क्षेत्रात सुधारणा करावी लागणार आहे. टीम इंडियाकडून खेळताना खेळातील विशिष्ट परिस्थितीची समज, मैदानावरील ऊर्जा आणि नेतृत्व कौशल्य या गोष्टींकडे आता आम्हा साऱ्यांनाच विशेष लक्ष द्यावं लागणार आहे, असं तो म्हणाला.
कोणताही खेळ खेळताना खेळाडूंकडून चुका होतात. त्यामुळे यापुढेही खेळाडूंकडून चुका होत राहतील हे नक्की, पण त्या चुकांमधून शिकणं आता गरजेचं आहे. वन डे मालिकेत आम्ही त्याच त्याच चुका सातत्याने करत राहिलो. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ कायम वरचढ ठरला. पण आता मात्र आमच्यापैकी प्रत्येकाने आरशासमोर उभं राहून स्वत:ला काही प्रश्न विचारायला हवेत आणि स्वत:शी थोडासा संवाद साधायला हवा, अशी प्रामाणिक कबुलीदेखील राहुलने यावेळी दिली.