पंतप्रधान मोदींच्या रॅलीद्वारे सौरव गांगुलीचा राजकारणात प्रवेश?
कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर तेथील रणधुमाळी आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आपली राजकीय इनिंग सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सौरव गांगुली सहभागी होतील, असे म्हटले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, ०७ मार्च रोजी ते एका सभेला संबोधित करणार आहेत. सौरव गांगुली पंतप्रधान मोदींच्या रॅलीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला सौरव गांगुली आणि भाजपकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
सौरव गांगुली आताच्या घडीला निवासस्थानी आराम करत आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय हा सर्वस्वी सौरव गांगुली यांच्यावर अवलंबून आहे. सौरव गांगुली यांची प्रकृती आणि स्वास्थ्य उत्तम असेल, तर ते यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. सौरव गांगुलींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे मत भाजप प्रवक्ते शामिक भट्टाचार्य यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, अलीकडेच सौरव गांगुली यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सौरव गांगुली यांचा हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांची अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. मात्र, त्रास जाणवू लागल्याने सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.