जयपूर : चित्रपट अभिनेता सोनू सूद याच्याशी संबंधित ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीमधून काळ्या पैशांच्या गुंतवणुकीबाबतचे अनेक महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत. प्राप्तिकर विभागाने सोनू सूदशी संबंधित मुंबई, लखनौ, जयपूर, दिल्ली आणि गुडगांव येथील २८ ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीच्या कारवाईमधून राजस्थानचे सहकार मंत्री उदयलाल अंजाना यांच्या कंपनीचे कनेक्शनही नियमांविरुद्ध झालेल्या गुंतवणुकीमध्ये दिसून आले आहे. सहकारमंत्री उदयलाल अंजाना यांच्याशी संबंधित इंफ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सोनू सूदशी संबंधित कंपनीमध्ये १७५ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्याबाबतची सबळ कागदपत्रे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहेत.
आयकर विभागाच्या छाप्यामधून अभिनेकता सोनू सूदच्या उत्पन्नाला बनावट पद्धतीने गुंतवले गेल्याची माहिती समोर आली आहे. कर चोरी करण्यासाठी सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बनावट संस्थांची नोंदणी केली होती. या बनावट संस्थांच्या नावावर बनावट कर्ज देण्यात आल्याची कागदपत्रेही मिळाली आहेत. या छाप्यांमधून २० हून अधिक नियमाविरुद्ध उत्पन्नाचे ट्रान्सफर आणि गुंतवणुकीसंबंधीची कागदपत्रे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहेत. बोगसगिरीचा हा खेळ ट्रस्टच्या नावावर बनवण्यात आलेल्या संस्थांद्वारेही करण्यात आला आहे. यामध्ये कॅशच्या देवाण-घेवाणीच्या बदल्यात अनेक बनावट पावत्याही जारी करण्यात आल्या आहेत.
करचोरी करण्यासाठी या फर्मकडून लेखा-पुस्तकांमध्येही बनावट नोंदी करण्यात आल्या आहे. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यामध्ये खुलासा झाला की यावर्षी २१ जुलैनंतर चॅरिटी फाऊंडेशनच्या नावावर २० कोटी रुपयांची संशयास्पद देवाण-घेवाण झाली आहे. या रकमेमध्ये १८.९४ कोटी रुपयांचे दान करण्यात आल्याची नोंद आहे. तर विविध मदत कार्यासाठी १.९ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा उल्लेख आहे. १७ कोटी रुपये चॅरिटी फाऊंडेशनच्या खात्यांमध्ये वापराविना पडून राहिल्याचे निदर्शनास आले. चॅरिटीच्या नावावर २.१ कोटी रुपयांची रक्कम परदेशामधूनही गोळा करण्यात आल्याची कागदपत्रे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहेत.