मुंबई : शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एक नवा आरोप केला आहे. सोमय्या यांनी अन्वय नाईक यांना धमकावलं होतं, असा आरोप आता संजय राऊतांनी केला आहे. ते पुढं पळतील आणि जनता त्यांच्या मागे लागेल त्यांची धिंड जनता काढेल, असा पुनरुच्चार राऊतांनी केला. त्यांना स्वप्नातही बंगलेच दिसतात, त्यांचे स्वत:चेच बेनामी बंगले असतील, असं ते म्हणाले. त्या जागेवर एकही बंगला नाही. हा भुताटकीचा प्रकार आहे, भाजपला भुतानं झपाटलं आहे, असंही राऊत म्हणाले. त्यांना कुठं जायचं तिथं जाऊ द्या, ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारी आहेत काय? ते चोर आणि लफंगा आहेत, सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊतांनी म्हटलं आहे की, अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यावर या लोकांनी बोलायला हवं. नाईकांना ज्यांच्यामुळं आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ हे लोक उतरले होते. एका मराठी माणसानं भाजपच्या दबावामुळं आत्महत्या केली. कारण अर्णब गोस्वामीला हे लोकं वाचवत होते. या किरीट सोमय्यांनी देखील नाईक यांना धमक्या दिल्या आहेत. अर्णबला बिल पाठवायचं नाही, त्यांना पैसे मागायचे नाही अशाप्रकारे त्यांना बोलावून सोमय्यांनी धमक्या दिल्या. यानंतरच अन्वय नाईकांनी आत्महत्या केली, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
भाजपचे हे लोकं मराठी माणसांना संपवू पाहत आहेत. हे सगळे अन्वय नाईकांचे हत्यारे आहेत. आणि आता तेच त्या जमिनीवर जात आहेत, असं राऊत म्हणाले. त्यांना कुठं जायचं तिथं जाऊ द्या, ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारी आहेत काय? ते चोर आणि लफंगा आहेत, सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर आहेत, असं राऊत यांनी एकेरी भाषेत म्हटलं आहे. आता त्यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हेही दाखल होणार आहेत. आता पाहत राहा, त्यांचा खेळ खल्लास झालाय. ते जे पळत आहेत ते जेलच्या दिशेने पळत आहेत, हे बापलेक नक्की जेलमध्ये जाणार आहेत, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कोर्लई दौऱ्याला राजकीय विरोध मान्य नाही : किरीट सोमय्या
किरीट सोमय्या हे मुख्यमंत्र्याच्या हरवलेल्या बंगल्यांच्या तक्रारीच्या पाठपुराव्यासाठी कोर्लई दौऱ्याला निघाले आहेत. या दौऱ्यात प्रशासनाने अडवले तर माघीरी फिरण्याची तयारी आहे. पण राजकीय विरोध झाला तर तो मान्य नसेल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्याच्या १८ बंगल्यांचे नेमके काय झाले याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. आज सकाळीच किरीट सोमय्या हे आपल्या मुंबईतील निवासस्थानातून कोर्लईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असाल तर उत्तर देऊ अशा शब्दात इशारा दिला आहे. याठिकाणी शिवसेना विरूद्ध भाजप असा वाद पेटण्याची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
जनतेला वास्तव कळाव यासाठी कोर्लईला निघालो आहोत. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाबतच्या तक्रारीसाठीचा पाठपुरावा करण्यासाठी निघालो आहोत. सरपंचांनी जी माहिती दिली ती सगळी माहिती मला माहितीच्या अधिकारात दिली आहे. माझ्यासोबत दौऱ्यात पनवेल, पेण आणि रायगडचे कार्यकर्ते आहेत. त्यांनाही या प्रकरणात नेमके काय झाले, हे समजून घ्यायचे आहे. ग्रामपंचायतीकडे २००९ पासून अन्वय नाईक आणि त्यांच्यानंतर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा वायकर मालमत्ता कर भरत आहेत. त्यामुळे या बंगल्यांचे नेमके काय झाले हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. तसेच हे बंगले अचानक कसे गायब झाले हेदेखील समजून घ्यायचे आहे. राज्यातील १२.५ कोटी जनतेला या बंगल्यांची वास्तविकता समजवणार असल्याचेही ते म्हणाले. माणसाकडून चूक होऊ शकते फक्त बंगले आहेत की नाहीत हे ठाकरेंनी सांगावे, असेही सोमय्या म्हणाले.
दौऱ्याआधीच सोमय्या यांना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करत असाल तर उत्तर मिळेल अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी याआधीच सगळी कागदोपत्री माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. आदेश असेल तर शिवसेनेचा दणका दाखवू असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेकडून राडा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोर्लई गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.