आरोग्य

कोविशील्ड लस घेतलेल्यांपैकी आतापर्यंत ११ जणांना दुर्मिळ आजार

नवी दिल्ली/लंडन: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लसीकरण अभियानात प्रामुख्यानं कोविशील्डचा वापर होत आहे. मात्र अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस घेतलेल्या ११ जणांना दुर्मिळ आजार झाल्याची माहिती पुढे आली आहे. लस घेतलेल्या ११ जणांना गिलन बार सिंड्रोम हा मेंदूशी संबंधित आजार झाला आहे. भारत आणि ब्रिटनमधील तज्ज्ञांनी केलेल्या दोन स्वतंत्र संशोधनांतून ही बाब समोर आली आहे.

केरळमध्ये कोविशील्डची लस घेतल्यानंतर ७ जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला. या व्यक्तींनी एकाच लसीकरण केंद्रातून लस घेतली होती. या लसीकरण केंद्रात आतापर्यंत जवळपास १२ लाख जणांचं लसीकरण झालं आहे. तर ब्रिटनमधील नॉटिंगहॅममध्ये चार जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला आहे. या भागात एकूण ७ लाख लोकांना अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस देण्यात आली आहे. सीरमनं तयार केलेली लस ब्रिटनमध्ये अ‍ॅस्ट्राझेनेका, तर भारतात कोविशील्ड नावानं ओळखली जाते.

केरळमध्ये ७ तर नॉटिंगहॅममध्ये ४ जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला आहे. या सगळ्यांनी १० ते २२ दिवसांपूर्वी कोविशील्डची लस घेतली होती. गिलन बार सिंड्रोम आजार झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चुकून मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याच्या बाहेर असलेल्या परिघीय मज्जासंस्थेवर आघात करू लागते. याबद्दल केरळ आणि नॉटिंगहॅममधील तज्ज्ञांनी अभ्यास केला. याबद्दलचा अहवाल एका नियतकालिकात १० जूनला प्रसिद्ध झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button