सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर-नर्सला मारहाण; रुग्णाच्या नातेवाईकांवर कारवाईची डॉक्टरांची मागणी
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या मारहाणीचा डॉक्टरांनी कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला. रविवारी रात्री सायन हॉस्पिटल परिसरात मेणबत्ती हातात धरुन मार्च काढत डॉक्टरांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली. अन्यथा संपावर जाण्याचा इशाराही मोर्चात सहभागी डॉक्टरांनी दिला.
लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय अर्थात सायन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यामुळे रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर आणि नर्स यांना बेदम मारहाण केली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ६५ वर्षीय प्यारेलाल गुप्ता उपचारासाठी रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी उपचार सुरु केले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चिडलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांसोबत मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील रुग्णाच्या आरोपी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरीही अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. आरोपींवर कायदेशीर कारवाई केली नाही, तर सर्व डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.