आरोग्य

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊन अपरिहार्य; मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करणार

मुंबईः कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध आवश्यक आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पुन्हा कडक लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याचे समजते.

कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असतानाच राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांना बेड मिळत नाहीयेत, असे संकट ओढवले आहे. यामुळं महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल लवकरच त्यासंबंधी गाइडलाइन जारी करण्यात येतील, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

राज्यात बुधवारी रात्री आठपासून संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा, अशी विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता लॉकडाऊनसंदर्भातील शेवटचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसंच, उद्या (बुधवारी) रात्री आठनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील लॉकडाऊन हा १५ दिवसांचा असेल. तसंच, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत. मात्र, जिल्हाबंदी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही तासांतच कठोर लॉकडाऊनच्या गाइडलाइन जारी होईल अशी माहिती समोर येत आहे. मुंबई लोकलबाबतचा निर्णयही मुख्यमंत्री उद्या जाहीर करणार असल्याचं समजतंय.

कडक लॉकडाऊनची आवश्यकता : एकनाथ शिंदे

”राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवा, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील”, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. राज्यामध्ये कोविडचे आकडे वाढतायत. हे पाहिल्यानंतर राज्यामध्ये फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारे आकडे खाली आणायचे असल्यास कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालूनही माणसं फिरतायत, वाहनं फिरतायत, नंबर खाली येत नाहीयेत. त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असंही एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केलंय.

परदेशातून लस आणण्याची केंद्राकडे मागणी : जितेंद्र आव्हाड

महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. लॉकडाऊनबाबत ही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी परदेशात तयार झालेल्या सर्व लसींना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारने लवकर परवानगी द्यावी अशी मागणी मंत्रिमंडळाने एकमताने मोदी सरकारला कळवण्याचे ठरवले आहे. यामुळे राज्यातील कोरोना परिस्थिती रोखण्यासाठी मदत होईल असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button